कामोठेतील रस्ते महानगरच्या पाईप लाईनमुळे 'गॅसवर' ; खोदलेले रोड पूर्ववत करण्याची मागणी
पनवेल दि.02 (वार्ताहर):  कामोठे वसाहतीतील बहुतांश रस्ते गॅस वाहिन्या टाकण्यासाठी खोदण्यात आले आहेत. त्यामुळे वाहन चालकांबरोबरच  पादचार्‍यांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषता सेक्टर 21 मधील रोडची अवस्था अत्यंत दयनीय आहे. हे रस्ते त्वरित पूर्वपदावर आणावेत अन्यथा पावसाळ्यात मोठी दैना उडेल अशी शक्यता सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी यासंदर्भात पत्रसुद्धा संबंधित यंत्रणांना दिले आहे.
     
 कामोठे वसाहतींमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी महानगर गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. यामुळे रहिवाशांना थेट घरापर्यंत ऑनलाइन गॅस मिळून गैरसोय टळेल याबाबत  दुमत नाही. ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र या वाहिन्या टाकण्यासाठी वसाहतीत मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरापासून सुस्थितीत असलेले रस्ते महानगर गॅसने खासगी ठेकेदारामार्फत खोदले आहेत. अगोदरच वेगवेगळ्या वाहिन्या टाकताना रस्त्यांची दुरवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे वसाहतीतील अनेक रस्त्यांची स्थिती चांगली नाही. त्यात सुस्थितीत असलेले रस्ते महानगर गॅसने ठीक ठिकाणी खोदले आहेत. ते रस्ते पुन्हा जैसे थे करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कित्येक रस्त्यांवर खड्डे पडले असून त्या ठिकाणी वाहने चालवणे जिकरीचे बनत चालले आहे. यासंदर्भात प्राधिकरणाकडून कोणतीही भूमिका घेतली जात नाही. त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. चांगल्या रस्त्यांची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. स्थानिक प्राधिकरण म्हणून सध्या रस्त्यांची देखभाल ही सिडकोकडे आहे. त्यामुळे अंतर्गत रस्ते चांगल्या स्थितीत ठेवण्याची जबाबदारी सिडकोची आहे. यासंदर्भात विशेष लक्ष घालून अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा. रस्त्यांची योग्य पद्धतीने डागडुजी करून रहिवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी कामोठे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांनी सिडकोकडे केली आहे.


चौकट: 
सेक्टर 21 येथील रस्त्यांची दुरवस्थाकामोठे सेक्टर २१ येथील रस्ते महानगर गॅस मुळे खोदलेले असून त्यामुळे रस्त्यावर जाताना लोकांना खूप त्रास होत असून तसेच येणाऱ्या पावसाळ्या पूर्वी हे काम करण्याचे खूप महत्त्वाचे आहे. बैसलं टॉवर ते चंद्र दर्शन हाईट्स तसेच धरती उस्तव ते रॉयल हाईट्स व जय गुरुदेव सोसायटी ते गणेश धाम सोसायटी पर्यत रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना धुळी चे त्रास होत आहे. हे रस्ते त्वरित दुरुस्त करण्यात यावेत अशी महत्वपूर्ण मागणी गायकवाड यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे.         

फोटोः खोदलेले रस्ते
Comments