२४ तास कर्तव्य बजाविणार्या पोलिसांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात
पनवेल, दि.26 (संजय कदम) ः सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्याने 24 तास जनतेच्या आरोग्यासाठी रस्त्यावर उभे राहून वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजाविणार्या पोलीस बांधवांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात म्हणून पाण्याची बॉटल्स, वेगवेगळी शितपेय व खाद्य पदार्थाचे वाटप करण्यात येत आहे.
स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणार्या पोलिसांसाठी काही तरी करता यावे या भावनेने जिल्हाप्रमुख शिरिष घरत, महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पनवेल उपविभाग संघटक आशुतोष शिंदे, नवीन पनवेल शाखाप्रमुख प्रयाग ताम्हाणे यांनी नवीन पनवेल शहरप्रमुख रुपेश ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांच्या साथीने उन्हातान्हात दिवस रात्र कर्तव्य बजाविणार्या पोलीस बांधवांसाठी बीट द हिट मोहीम लॉकडाऊन संपेपर्यंत अविरत राबवणार असून यात पोलिसांसाठी पाण्याची बॉटल्स तसेच घरगुती शीतपेय व वेगवेगळे घरगुती पदार्थांचे वाटप करणार आहेत. त्याची सुरुवात आज पासून झाली आसुन या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पोलिसांनी आशुतोष शिंदे व शिवसेना नविन पनवेल टीम चे आभार मानले व सहकार्याचे आश्वासन दिले. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. सोयीसुविधांची तारांबळ झाली आहे. परप्रांतीयांचे स्थलांतरण सुरू झाले. या परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. पोलीस अहोरात्र बंदोबस्तावर सज्ज आहेत व त्यांचे कर्तव्य जबाबदारीने पार पाडत आहेत. त्यांना मदतीचा हात म्हणून शिवसेनेने हा आगळावेगळा उपक्रम राबविला आहे.