लाखो रुपयाच्या तेलाची ऑर्डर देवून पसार होणार्‍या टोळीला पोलिसांनी केले गजाआड
पनवेल, दि. २९ (संजय कदम) ः तेलाची लाखो रुपयाची ऑर्डर देवून त्यानंतर सदर तेल ताब्यात घेवून ऑर्डरच्या बिलाचे पैसे न देता पळ काढणार्‍या टोळीपैकी दोघांना तुर्भे पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्या अटकेमुळे अशा प्रकारचे फसवणूकीचे अनेक गुन्हे उघडकीस येणार आहेत.
आरोपी मुकेश पटेल (33 रा.कामोठे) व त्याचा सहकारी यांनी फिर्यादीला चार लाख रुपये किंमतीच्या सफोला ऑईल व पॅराशुट ऑईलची ऑर्डर देवून त्यास फेक पोर्टलद्वारे पेमेंट पाठवून सदरचा माल हा पनवेल तालुक्यातील कॉलेज रोडच्या हद्दीत भाड्याने घेतलेल्या गोडावूनमध्ये ठेवला व तेथून सकाळी दुसरीकडे हलविला. दरम्यान फिर्यादीस पेमेंटची फसवणूक झाल्यामुळे त्याने सदर गोडावूनमध्ये भेट दिली असता गोडावून पूर्ण रिकामे दिसले. याबाबतची तक्रार त्यांनी तुर्भे पोलीस ठाण्यात करताच वपोनि राजेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवूरकर व गुन्हे अन्वेषण पथक यांनी सलग तीन दिवस सीसीटीव्ही फुटेज चेक करून व गुप्त बातमीदाराद्वारे सदर गुन्ह्यात वापरलेले वाहन 407 हा टेम्पो शोधून काढला व त्या टेम्पोच्या मुळ मालकापर्यंत पोहोचले. व त्याने दिलेल्या माहितीनुसार मुकेश पटेल याला अटक करून त्याच्याकडून 3 लाख 78 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर फरार आरोपीचा शोध तुर्भे पोलीस करीत आहेत. 



फोटो ः तुर्भे पोलिसांनी हस्तगत केलेला मुद्देमाल व आरोपी.
Comments