पनवेल / वार्ताहर :- कोविड काळात खांदा कॉलनी परिसरातील नागरिकांची खूप परवड होत आहे.संपूर्ण महापालिका हद्दीमध्ये खांदा कॉलनी असा एकमेव विभाग आहे ज्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधासाठी डेडिकेटेड हॉस्पिटल नाही. अनेक विनंत्या करून देखील येथे कोरोना सेंटर नसल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला आंदोलनाचा इशारा द्यावा लागला आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल शहर उपाध्यक्ष विजय काळे यांनी शुक्रवारी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना खरमरीत पत्र लिहून कोरोना सेंटर चालू करण्याबाबत कळविले आहे. या पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की खांदा कॉलनी परिसरातील नागरिकांची संख्या 70 हजाराहून अधिक आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक असून देखील या ठिकाणी कोरोना सेंटर नाही. आजमितीला साधारणपणे 35 ते 40 कोरोना पोझीटिव रुग्ण खांदा कॉलनी येथे आढळून येत आहेत. आयसीयू बेड मिळवणे, ऑक्सिजन बेड मिळवणे खांदा कॉलनी मधील नागरिकांना अत्यंत त्रासाचे ठरते.यासाठी त्यांना कळंबोली किंवा पनवेल येथे जावे लागते. त्यामुळे लवकरात लवकर खांदा कॉलनी परिसरामध्ये डेडिकेटेड कोविड सेंटर उभारावे अन्यथा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असा सज्जड इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
चौकट
याबाबत महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी असे सांगितले की खांदा कॉलनी मध्ये नवीन सेंटर उभारणे तूर्तास शक्य नसल्यामुळे परिसरातील अस्तित्वात असलेल्या एखाद्या हॉस्पिटल मध्ये कोरोना सेंटर उभारण्याचे आमचे प्रयत्न आहेत.याबाबत चर्चा सुरू असून दोन दिवसांत आम्हाला यश येईल.