ज्येष्ठ नागरिक, महिलांना लुबाडणारी इराणी दुक्कली जेरबंद...
पनवेल, दि.१० (संजय कदम) ः बँकेमध्ये नोटा मोजून देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करुन लोकांना लुबाडणारे तसेच पोलीस असल्याची बतावणी करुन, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या थापा मारुन ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना लुबाडणार्‍या दोघा सराईत भामट्यांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे.
जाहीद अली जावेद अली जाफरी (36) आणि काबुल अली नौशाद जाफरी (54) अशी या दोघांची नावे असून या दोघांनी अशाच पध्दतीने नवी मुंबईसह विविध भागात केलेले 12 फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. दरम्यान, सदर दुक्कलीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सदर कारवाईत अटक करण्यात आलेले दोघे भामटे कल्याणच्या आंबिवली भागात राहण्यास असून ते एपीएमसी फळ मार्केट मधील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये गेले होते. यावेळी सदर बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या राजाराम काळे या ज्येष्ठ नागरिक फळ विव्रेत्याला सदर दुक्कलीने पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून 50 हजार रुपये घेतले आणि हातचलाखी करुन त्यातील 10 हजारांच्या नोटा काढून घेऊन पलायन केले होते. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर राजाराम काळे यांनी तत्काळ एपीएमसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामगुडे यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमेध खोपीकर, महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना चिवटे, पोलीस हवालदार अशोक खैरे, पोलीस शिपाई जयपाल गायकवाड, विलास भोर, रवि जगदाळे आदिंच्या पथकाने तत्काळ दोघा लुटारुंचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांचे पथक एपीएमसीतील फळ मार्केटमध्ये आरोपींचा शोध घेत असताना, फिर्यादी राजाराम काळे यांनी दिलेल्या वर्णनाशी मिळत्याजुळत्या दोन व्यक्ती पोलिसांच्या निदर्शनास आल्या. त्यामुळे पोलिसांनी दोघांचा पाठलाग करुन पकडल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली. या चौकशीत त्यांनीच राजाराम काळे यांच्या जवळची रोख रक्कम लुबाडल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक करुन दोघांची कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी अशाच पध्दतीने नवी मुंबईमध्ये तसेच बोरीवली, अंधेरी, तळेगाव, अलिबाग, गुजरात आदि भागात 12 फसवणुकीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, सदर दोघांकडून अशाच प्रकारचे फसवणुकीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सदर दुक्कल इराणी व्यक्ती असून त्यांच्यावर यापूर्वी अशाच प्रकारचे 20 ते 25 गुन्हे दाखल आहेत. सदर भामट्यांच्या हातून कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Comments