3 कोटीची खंडणी मागणारा वकील गजाआड
पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः वकिलाने आपल्याच अशीलाकडे 3 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र पैसे दिले नाही म्हणून शिपिंग कंपनीचा मालक असलेल्या फिर्यादीचे अपहरण करणार्या वकीलाला खारघर पोलिसांनी गजाआड केले आाहे.
सदर वकिलाने फिर्यादीचे नवी मुंबईतून अपहरण केले. अपहृत व्यक्तीने चतुराईने पत्नीला फोन केला. त्यानंतर खारघर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी व महिला पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांचे तत्परता आणि सतर्कतेमुळे फिर्यादीची सुटका झाली. आरोपी विमल झा याला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते. या फुटेजमध्ये आरोपी विमल झा याने आपल्या अशिलाच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला तीन वेगवेगळ्या ठिकाणी नेले. तिथे नेऊन तक्रारदाराला मारहाण केल्याचा आरोप आहे. फिर्यादीचे ज्या गाडीतून अपहरण करण्यात आले, त्या गाडीचे टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. खारघर पोलिसांनी विमल झा याला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.
नाशिकमधील फार्म हाऊसवर मारहाण करून
फिर्यादीला आधी कर्जत, नंतर कल्याण रोड मार्गे मुरबाड आणि त्यानंतर माळशेज घाट गाठत आळे फाटा मार्गे नाशिकला एका फार्म हाऊसवर बंद खोलीत ठेवले होते. यावेळी वारंवार पैशांसाठी तगादा लावत फिर्यादीच्या डोक्यात जबर मारहाण करण्यात आली. तसेच पाण्यात बुडवून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला.जोपर्यंत पैसे देत नाही, तोपर्यंत 3 ते 4 दिवस एकाच ठिकाणी त्याला डांबण्याचा वकिलाचा प्लॅन होता.
नाशिकच्या बिग बझारमध्ये खरेदी करत असताना फिर्यादीने नजर चुकवून बिग बझारमधील कर्मचार्याच्या मोबाईलवरुन पत्नीला कॉल केला होता. ज्या नंबरवरुन कॉल आला, तो ट्रेस केला असता पोलिसांना नाशिक येथील लोकेशन सापडले. पोलिसांच्या चतुराई आणि सतर्कतेमुळे फिर्यादीची सुटका झाली. आरोपी वकील विमल झा याच्यासह गुन्ह्यात असलेले चार साथीदार फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहे. नवी मुंबईतून अपहरण करताना आरोपीसह तिघे साथीदार होते आणि त्यानंतर नाशकात आणखी एक जण सामील झाला. फिर्यादीला पैसे घेऊन ठार करण्याच्या बेतात हे सारे जण होते, असे फिर्यादीने सांगितले. शिपिंग कंपनीचा मालक हा गेल्या वर्षी वकील विमल झा याच्या संपर्कात आला होता. वकिलाने माझी सगळीकडे ओळख असून तुमच्या कंपनीचे सगळे काम मी करून देतो, असे आश्वासन दिले. काम दिले नसतानाही परत परत भेटण्यास भाग पाडत असे. वकील विमल झा हा तेव्हापासून फिर्यादीच्या मागावर होता.खोट्या तक्रारीत अडकवण्याची धमकी जेव्हा शिपिंग कंपनीच्या मालकाने पुढील कोणताही व्यवहार नाही, असे कळवले तेव्हापासून वकिलाने स्वतःच्या अशिलाच्या मागे माणसे लावून तो कुठे आणि कसा जातो याची नोंद केली. खोटी तक्रार करुन अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. जेव्हा अशिलाने धमकीला न जुमानता आपले सगळे संबंध तोडण्याचे प्रयत्न केला, तेव्हा वकिलाने थेट अपहरण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.सदर गुन्हयातील इतर आरोपीना लवकरच अटक करण्यात येणार असुन आरोपी अशाप्रकारे अजुन काही गुन्हे केले आहेत का याबद्दल महिला पोलीस निरीक्षक विमल बिडवे या वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी ,पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहा पोलीस आयुक्त भोसलेपाटील यांचे मार्गदर्शनानुसार तपास सुरू आहे.