पनवेल / दि.२० (वार्ताहर) : इंटेरियरच्या कामाकरता कारागीर यांसाठी आणि टाइल्स येण्यासाठी पैसे घेऊन काम न करता फसवणूक केल्याचा प्रकार खारघर येथे घडला आहे. आरोपी विरोधात खारघर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघर सेक्टर 23 येथील रोली प्रदीप श्रीवास्तव यांना त्यांच्या नवीन घरातील इंटेरियरचे काम करायचे होते. यावेळी इंटेरिअर डेकोरेटर भानु प्रताप सिंग यांना त्यांचा फोन आला. त्याने साईडची पाहणी केली. आणि त्यांच्यात घरातील किचन, पीओपी, टाइल्स, इलेक्ट्रिक आणि कलर या कामांचे सात लाख 42 हजार रुपये मध्ये काम ठरले. यावेळी एग्रीमेंट न बनवता चांगलं काम करून देतो असे त्यांनी सांगितले. श्रीवास्तव यांनी भानु प्रताप सिंह यांना 50 हजार रुपयांचा चेक दिला. सप्टेंबर २०२१ या महिन्यात त्यांनी फ्लॅटची चावी काम करण्यासाठी दिली. यावेळी एक लाख रुपये रोख दिले. भानु प्रताप सिंह यांनी त्यांच्या हॉलमधील टाइल्स, मेन डोअर आणि किचनमधील टाईल्स काढून घेतल्या व काम सुरू केल्याचा दिखावा केला. त्यानंतर पुढील कामासाठी पैसे मागून श्रीवास्तव यांनी आणखी दोन लाख रुपये त्यांना दिले. मात्र रक्कम घेऊन देखील त्याने किचनचे किरकोळ काम केले. व काम पूर्ण करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर श्रीवास्तव यांनी भानू प्रताप याना फोन करून काम पूर्ण करा, अन्यथा पैसे परत द्या असे सांगितले असता भानुप्रताप याने पूर्ण पैसे द्या, लगेच काम सुरू करतो असे त्यांना सांगितले. यावेळी भानुप्रताप याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला होता. यावेळी श्रीवास्तव यांना भानु प्रताप सिंह याने टाइल्स कारागीर याचे 1 लाख 8 हजार, स्टाईल सप्लायर याचे 24 हजार, गुलशन कुमार यांचे 75 हजार, सागर प्रकाश याचे 51 हजार, ब्रिजेश पांडे यांचे 60 हजार आणि प्लायवूड सप्लायर याचे 66 हजारांचे सामान घेऊन त्यांना रक्कम दिले नसल्याचे समजले. आरोपी भानु प्रताप सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे