वडघर, पुष्पकनगर, करंजाडेतील दफनभूमीचा प्रश्न सुटला--- चिंचपाडा ग्रामस्थांच्या मागणीला अखेर यश....
सिडको अधिकाऱ्यांनी दफनभूमीच्या जागेची सीमा रेखा आखली
सोमवारपासून प्रत्यक्षात होणार सुरुवात
विमानतळ दहा गाव समितीचा अखंड पाठपुरावापनवेल/ (वार्ताहर) --  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या संपण्याचे नाव घेत नाही. अनेक अडचणींचा सामना त्यांना आजही करावा लागत आहे. हा संघर्ष केवळ जगण्याचा नाही, तर मरणानंतरही तो टळलेला नाही. नुकताच दफन भूमीच्या प्रश्नाबाबत चिंचपाडा ग्रामस्थ आक्रमक होत, दफनभूमी साठी आरक्षित असणाऱ्या जागेवर नामफलक उभारून त्याचे उद्घाटन केले होते. याची दखल घेत सिडकोने दहा गाव संघर्ष समितीच्या पदधिकाऱयांसोबत बैठक घेऊन दफनभूमीचा प्रश्न सोडविण्याचे जाहीर करत शनिवारी ता. ६ मार्च रोजी सकाळी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दफनभूमीच्या जागेवर भेट देत या जागेची सीमा रेखा आखली व सोमवारपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दहा गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नाथा पाटील यांनी दिली.

यावेळी सिडकोचे अधिकारी प्रणित मूळ, वर्मा, ताटे हे अधिकारी व त्याच्याबरोबर विमानतळ दहा गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नाथा पाटील, सी.टी.पाटील, विश्वास पाटील, संतोष पवार हे उपस्थित होते.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीत अडथळा करणार्या गावांतील ग्रामस्थांना वडघर, करंजाडे या ठिकाणी स्थलांतरित केले आहे. या बाधितांसाठी सिडकोने जागा दिली असली तरी या ठिकाणी कोणत्याच सुविधा अद्याप पुरवण्यात आलेल्या नाहीत. सिडकोने केवळ मोकळ्या भूखंडावर प्रत्येकाला जागा आखून दिली गेली आहे. येथे बाधितांनी आपली घरे बांधायची आहेत. मात्र तोपर्यंत बाधितांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. भाड्याने राहायला गेल्यावर तर ग्रामस्थांच्या अडचणींत अधिकच वाढ होत आहे. विमानतळ बाधितांसाठी सिडकोच्या वतीने वडघर पुष्पकनगर वसवण्यात आले. या ठिकाणी अजून कोणत्याच प्राथमिक सोयीसुविधा नसल्याने बाधित येथे राहायला गेले नाहीत. चिंचपाडा या गावातील अनेक कुटुंब करंजाडेमध्ये राहायला गेले आहेत. तालुक्यातील कोल्हीकोपर आणि चिंचपाडा येथील गावे उठविल्यानंतर ग्रामस्थांचे वडघर येथे पुनर्वसन करण्यात आले. त्याचबरोबर ऐन दुःखाच्या वेळी दफनविधी करण्यासाठी येथील पुनर्वसित ग्रामस्थांना तर तारेवरची कसरत करावी लागत आहे. चिंचपाडा गावालगत असलेल्या विठ्ठलवाडी येथे एका दीक्षित कुटुंबीय यांच्या घरातील एका कोवळ्या चिमुकलीचे दोन दिवसापूर्वी निधन झाले होते. यावेळी त्या कुटुंबियांसोबत विठ्ठलवाडी यांच्यासह चिंचपाडा ग्रामस्थ त्यांच्या दुःखात सहभागी होत. चिंचपाडा ग्रामस्थाना या चुमुकलीला दफन करण्यासाठी रात्रीच्या वेळी वणवण करावी लागली. त्यामुळे सिडकोला न जुमानता वडघर येथील स्मशानभूमी शेजारी या चुमुकलीला दफन करण्यात आले. यावेळी चिंचपाडा ग्रामस्थानी सिडकोकडे वारंवार दफनभूमीसाठी मागणी करून सिडको दुर्लक्ष करीत होती. या प्रश्नावर सिडको कधी न्याय देणार या प्रतीक्षेत न थांबता ग्रामस्थांनी दफनभूमी साठी आरक्षित असणाऱ्या जागेवर नामफलक उभारून त्याचे उद्घाटन केले होते. याची दखल घेत सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दहा गाव संघर्ष समितीबरोबर शुक्रवारी सिडको कार्यालयात बैठक घेतली. यावेळी स्मशानभूमीला सर्व सुविधा पुरविण्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी समितीला सांगितले. तसेच वरचे ओवळे गावाच्या पुनर्वसनठिकाणी स्मशानभूमी व दफन भूमीच्या मागणीला होकार दर्शवित लवकरच उभारणी होणार आहे. त्याचबरोबर वडघर, करंजाडेतील दफनभमीबाबत सिडकोच्या अधिकाऱयांना मुखर्जी यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश शुक्रवारच्या बैठकीत दिले होते. त्यानुसार शनिवारी ता. ६ मार्च रोजी सकाळी सिडकोचे अधिकारी व दहा गाव संघर्ष समितीचे पधाधिकारी उपस्तित होते. सिडकोच्या अधिकाऱयांनी स्मशानभूमी लगत असलेल्या जागेवर सीमा रेखा आखली. त्याचबरोबर सोमवारपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असल्याचे सिडकोच्या अधिकाऱयांनी सांगितले. मात्र चिंचपाडा ग्रामस्थानी केलेले धाडस आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय दहा गाव संघर्ष समितीच्या पदधिकाऱयांच्या पाठपुराव्यामुळेच दफनभूमीचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे चिंचपाडा ग्रामस्थ व समितीचे पदाधिकारी यांचे वडघर व करंजाडेतील नागरिकांनी आभार मानले आहे.  

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दहा गाव संघर्षच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्ताचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी सिडकोकडे वारंवार बैठका सुरु आहेत. तसेच वडघर, करंजाडे येथील दफनभूमीच्या प्रश्नाविषयी सिडकोकडे बैठक घेतली होती. त्या बैठकीत सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी सकारत्मक भूमिका घेत दफनभूमीचा विषय तात्काळ सोडविण्याचे आदेश अधिकाऱयांना दिले. त्यानुसार शनिवारी दफनभूमीच्या जागेची सीमा रेखा आखली. आणि लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.
- नाथा पाटील - अध्यक्ष
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय दहा गाव संघर्ष समिती


Comments