पनवेल / दि.२० (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील वाघिवली, जुई कामोठे खारघर, कोली-कोपर याठिकाणी खाडीपात्रात अनधिकृत वाळूचा साठा केलेले वाळूचे हौद पनवेल तहसील कार्यालयामार्फत नष्ट करण्यात आले आहेत.
वाघिवली, जुई कामोठे, खारघर, कोली कोपर याठिकाणी खाडीतून वाळू साठा काढून वाळू साठा केल्याची माहिती पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांना मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी वाळू उपसा बाबत तपासणी करण्यासाठी नायब तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली. या ठिकाणी अनधिकृत वाळूचा साठा सापडून आला. तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाळूचा साठा करण्यासाठी तयार करण्यात आलेले हौद जेसीबीच्या साह्याने नष्ट करण्यात आले. तसेच येथील ठिकाण हे निर्मनुष्य असल्याने या ठिकाणी पुन्हा अनधिकृत वाळूचा उपसा किंवा साठा होऊ नये यासाठी वाळूमाफिया द्वारे तयार करण्यात आलेल्या खाजगी रस्त्यावर जेसीबीच्या साह्याने चर खोदण्यात आला आहे. जेणेकरून या ठिकाणी पुन्हा वाळू साठा करून वाहतूक होणार नाही याची दक्षता घेऊन चर खोदण्याचे काम सुरू केलेले आहे. खाडीकिनारी वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे दोन सक्शन पंप आढळून आले. ते तेथील खाडी पत्राच्या पाण्यात बुडवून नष्ट करण्यात आले आहेत. अशा प्रकारे जर कोणी अनधिकृत वाळू उपसा करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार विजय तळेकर यांनी दिली.