पनवेल महानगरपालिकेने पाळीव श्‍वानावरील शुल्क अट तात्काळ मागे घेण्याची शिवसेना महिला आघाडीची मागणी

पनवेल / दि.२३ (वार्ताहर) :-  पनवेल महानगरपालिकेने पाळीव श्‍वानावरील शुल्क अट तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी पनवेल शिवसेना शहर संघटक अर्चना अनिलकुमार कुळकर्णी यांनी महानगरपालिकेला दिलेल्या निवेदनात केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पालिका हद्दीतील अनेक माणसे स्वतःच्या हौसेपोटी व स्वसंरक्षणासाठी विविध प्रजातीचे श्‍वान स्वतःच्या जबाबदारीवर पाळत असतात. त्यांचे खाणे-पिणे, स्वच्छता, औषधोपचार तसेच लसीकरण करून आपल्या अपत्याप्रमाणे त्यांचे पालन पोषण करतात. नुकत्याच झालेल्या महासभेत महानगरपालिकेने पाळीव श्‍वानांवर वार्षिक कर आकारण्याचे ठरविल्याचे समजले. नोंदणी आम्ही समजू शकतो परंतु कर आकारणे हे श्‍वान मालकांना मान्य नाही आहे. या करामुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नात एवढी किती भर पडणार आहे? व त्या बदल्यात आम्हाला व आमच्या श्‍वानांना कोणत्या सोयी-सुविधा मिळणार आहेत? दर महिन्यांनी मोफत लसीकरण होणार का? श्‍वानांसाठी वेगळी स्मशानभूमी उपलब्ध करून देणार का? हे आणि अशा अनेक सोयीसुविधा देण्यात येत नसताना अनाठायी कर आकारणे कितपत योग्य आहे? तरी याबाबत सहकार्याची भूमिका ठेवून याची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी अर्चना कुळकर्णी यांनी निवेदनात दिली आहे. या निवेदनात पनवेलमधील शेकडो श्‍वान मालकांनी पाठींबा दिला आहे.
Comments