पनवेल दि.१७ (वार्ताहर)- पनवेल शहरातील उरण नाका परिसरात हातगाड्यांचा पसारा वाढत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे त्यामुळे पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
पनवेल परिसरातील उरण नाक्यावर वाहतूक कोंडी हि नित्याचीच आहे. येथे कधीही जावे तर वाहतूक कोंडी जाणवतेच. ज्या दिवशी येथे वाहतूक कोंडी जाणवणार नाही त्या दिवशी वाहनचालकांना चुकल्या सारखे वाटेल इतकी वाहतूक कोंडीची सवय नागरिकांच्या अंगवळणी पडली आहे. रस्त्यावरील बाजारपेठ आणि पार्किंग हि येथील वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे आहेत. त्याचबरोबर पनवेल परिसरात हातगाड्याचा पसारा मोठ्या संख्येने वाढत आहे. त्यामुळे हातगाडीवाले बिनधास्तपणे रस्त्यावर आपली हातगाडी लावत आहेत. पनवेल शहराची प्रमुख बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या टपाल नाका येथून उरण नाक्यापर्यंत फळे आणि भाज्या विक्री करणाऱ्या हातगाड्या उभ्या असतात. या गाड्या पुढे उरण नाक्यावर गर्दी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढीचे मुख्य कारण आहे. हातगाड्यावर महापालिका वारंवार कारवाई करीत असते, मात्र आणखी हातगाड्या येतातच कुठून असा सवाल उपस्तित होत आहे. वाहतूक पोलीस देखील वारंवार हातगाड्या हटविण्यास सांगत असतात, तरी ही हातगाडीचालक त्याठिकाणावर ठाण मांडून असतात, पालिकेकडे वारंवार तक्रारी येत असल्याने अखेर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने उरण नाका परिसरातील हातगाड्या जप्त केल्या आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
अतिक्रमण पथक येताच हातगाडीवाले जातात सिडको हद्दीत...
काही महिन्यापूर्वी पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हद्दीतील हातगाड्यावर कारवाईचा सपाट लावला होता. मात्र काही महिन्यांपासून कारवाई थंडावली असल्याने परिसरात हातगाड्यांची संख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. उरण नाक्यावर पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक येताच हातगाडीवाले आपली हातगाडी उरण नाका उड्डाणपुलाच्या पुढे म्हणजे सिडको हद्दीत वडघर, करंजाडे वसाहतीमध्ये पळ काढत असल्याचे दिसून येत आहेत. मात्र यांच्यावर महापालिका व सिडको विभागाने संयुक्तिक कारवाई केली तरच हातगाडी मुक्त पनवेल व वसाहत होईल असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.
फोटो- हातगाड्यांवरील कारवाई