पनवेल / दि.३ (संजय कदम) ः कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात सर्वच पोलीस ठाण्याच्या अंतर्गत धडक कारवाया सुरू असल्याने नागरिकांमध्ये भितीयुक्त वातावरण आहे.
कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रासह देशात सुरू आहे. रायगड जिल्ह्यात सुद्धा या लाटेचा प्रसार होताना दिसत आहे. पनवेल तालुक्यातही रुग्ण कमी अधिक प्रमाणात वाढत आहेत. हे रोखण्यासाठी शासनाचे सर्वतोपरीने प्रयत्न सुरू आहेत. कोरोना लसीकरणाचा तीसरा टप्पा सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे. असे असतानाही वेळोवेळी कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा, सार्वजनिक उपस्थिती कमी प्रमाणात लावा यासारखे अनेक आदेश शासनाकडून काढण्यात आले आहेत. अनेकांना विविध कार्यक्रम पार पाडण्यासाठी शासनाकडून काही अटी व शर्ती सुद्धा लागू करण्यात आल्या आहेत. असे असतानाही अनेक जण मोठ्या प्रमाणात या अटी व शर्तीचे पालन न करता बिनधास्तपणे कार्यक्रम करत असल्याने अशांविरोधात सर्वच ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने हळदी समारंभ, लग्न, पुजा, वाढदिवस व फार्म हाऊस वरच्या पार्ट्या यावर कारवाई सुरू आहे. तसेच रस्त्यावर बिनदिक्कतपणे मास्क न लावता चालणे किंवा वाहने चालविणे अशा व्यक्तींवर सुद्धा नियमाप्रमाणे कारवाई सुरू असल्याने अशा प्रकारे पोलिसांचा धाक आता चांगलाच सर्वसामान्यांवर वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. कोव्हीड लसीकरण सुद्धा मोठ्या प्रमाणात पनवेल परिसरात सुरू आहे. तरी या लसीकरणाचा फायदा सर्वांनी घ्यावा, असे आवाहन सुद्धा शासकीय यंत्रणेकडून करण्यात येत आहे.