दागिने पॉलिश करून देतो असे सांगून महिलेची केली फसवणूक..


पनवेल, दि.२४ (वार्ताहर) :-  दागिने पॉलिश करून देतो असे सांगून एका महिलेकडे असलेले ४० हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केल्याची घटना तालुक्यातील तळोजा परिसरात घडली आहे.

तळोजा परिसरात राहणार्‍या दर्शना पाटील (३४) यांच्याकडे काही भामटे गेले व तुमच्याकडे असलेले दागिने चमकवून देतो असे सांगून त्यांच्याकडे असलेले ४० हजार रुपये किंमतीचे दागिने स्टीलच्या डब्यात टाकण्यास सांगितले व डब्यात पाणी हळद, मीठ टाकून १५ मिनिटानंतर डबा उघडण्यास सांगून हातचलाखीने सदर दागिने लंपास करून ते तेथून निघून गेले. 

१५ मिनिटाने दर्शना पाटील यांनी डबा उघडला असता त्यांना डब्यात दागिने आढळून आले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Comments