तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या सुरक्षिततेबाबत  आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी आग्रही 


तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या सुरक्षिततेबाबत

 आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी आग्रही 


 

पनवेल(प्रतिनिधी) तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या सुरक्षिततेबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरु विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नाच्या अनुषंगाने कामगारांच्या सुरक्षेसाठी शासनाचे लक्ष वेधले.

    तळोजा औद्योगिक वसाहतीत सन २०१६-२०१७, सन २०१७-२०१८ व सन २०१८ ते माहे जुन, २०१९ पर्यंत अनेक कारखान्यांमध्ये स्फोट झाल्यामुळे लागलेली आग व वायुगळती अशा विविध घटनांमुळे अनेक कामगारांचा मृत्यु झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. या औद्योगिक वसाहत परिसरातील ९०७ हेक्टर जागेवर १२०० भूखंडांवर शेकडो छोटया-मोठया कारखान्यांमध्ये मोठी औद्योगिक उलाढाल होत असून इंजिनियरिंग, मत्स्य प्रक्रिया, फुड, रसायने यादी कारखान्यांचा समावेश असून लाखो कामगार काम करीत असून औद्योगिक वसाहतीमध्ये आपतकालीन आराखडा नसल्यामुळे कामगारांना व नागरिकांना कंपनीमध्ये होणाऱ्या अपघाती घटनांमुळे आपला जीव गमवावा लागत असून अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत. त्यामुळे प्रकरणी शासनाने चौकशी करून उक्त औद्योगिक वसाहतीमध्ये आपत्कालीन आराखडा तयार करुन कामगारांच्या सुरक्षिततेकरीता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न दाखल केला होता.


      या प्रश्नावर राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की,  पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीत सन २०१६ ते जून, २०१९ पर्यंत एकूण २० कारखान्यांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. सदर घटनेत ११ कामगार मृत व ४ कामगार जखमी झाले आहेत. तसेच ४ कारखान्यांमध्ये स्फोटाच्या घटना घडल्या असून त्यात ७ कामगार जखमी झाले आहेत. तसेच एका कारखान्यात वायुगळतीची घटना घडली असून त्यात २ कामगार बाधीत झाले आहेत. सदर घटना घडल्याचे त्या-त्या वेळी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या निदर्शनास येवून त्यांचेमार्फत संबंधितांविरुध्द कारवाई करण्यात आलेली आहे. अतिधोकादायक व धोकादायक प्रक्रिया असलेल्या कारखान्यांनी आपत्कालिन प्रतिसाद योजना तयार केल्या असून त्यानुसार कारखान्यांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आले आहे.

Comments