हृदयाच्या मागे असलेली थायरॉईडची १८ सेंटीमीटरची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश
नवी मुंबईतील मेडिकव्हर रुग्णालयात १० तासांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
दोन वर्षांपासून श्वास घेण्याच्या त्रासाने त्रस्त महिलेला दिलासा...
नवी मुंबई :
एका ५७ वर्षीय महिलेला गेल्या दोन वर्षांपासून चालताना धाप लागणे आणि अशक्तपणा जाणवत होता. तपासणीदरम्यान तिच्या छातीत हृदयाच्या मागील बाजूस तब्बल १८ सेंमींची गाठ असल्याचे निदान झाले. हृदय, श्वसनमार्ग आणि प्रमुख रक्तवाहिन्यांच्या जवळ असलेली ही गाठ काढणे हे डॉक्टरांसमोरील एक मोठे आव्हान होते. नवी मुंबईतील मेडिकव्हर रुग्णालयातील डॉक्टरांनी सुमारे १० तासांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून ही गाठ यशस्वीपणे काढली. शस्त्रक्रियेनंतर कुठलाही दुष्परिणाम न आढळता रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
रुग्णालयातील कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. राहुलकुमार एन. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भूलतज्ज्ञ डॉ. विदिशा, संदीप दिसले ( नर्स) , अतिदक्षता विभागातील डॅाक्टरांची टिम आणि शस्त्रक्रिया कक्षातील कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
अलिबाग येथे राहणाऱ्या श्रीमती दहिता जैतू या गृहिणीला गेल्या दोन वर्षांपासून चालताना श्वास घेण्यास त्रास होणे आणि अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन हालचालींवरही परिणाम होत होता. गेल्या वर्षभरात त्यांनी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला; मात्र हा त्रास कायम राहिला. अखेर अलिबाग येथील एका स्थानिक डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला.
रुग्णालयात तपासणीदरम्यान त्यांच्या गळ्याजवळ थोडी सूज दिसून आली. सीटी स्कॅनमध्ये छातीच्या आतील भागात, हृदयाच्या मागे मोठी गाठ असल्याचे स्पष्ट झाले. ही गाठ थायरॉइड ग्रंथीशी संबंधित अतिरिक्त ऊतींपासून तयार झाली होती. या स्थितीला वैद्यकीय भाषेत ‘थायरोथायमिक थायरॉईड रेस्ट’ (Thyrothymic Thyroid Rest) असे म्हणतात. सामान्यतः थायरॉइड ग्रंथी मानेमध्ये असते; मात्र गर्भाच्या विकासादरम्यान काही थायरॉइड ऊती त्यांच्या नेहमीच्या स्थानापासून वेगळ्या ठिकाणी राहू शकतात. अशा ऊतींपासून छातीमध्ये अतिरिक्त थायरॉइड ऊती तयार होऊ शकतात.
साधारणतः अशी अतिरिक्त उत्ति केवळ 1 सेंटीमीटर ची असते पण ह्या पेशंट मध्ये ही ऊतींची वाढ तब्बल १८ सेंमीपर्यंत झाली होती. विशेष म्हणजे, छातीमध्ये वाढणाऱ्या थायरॉइडच्या गाठी सामान्यतः ९० % हृदयाच्या पुढील बाजूस आढळतात; मात्र या रुग्णामध्ये गाठ हृदयाच्या मागे आणि हृदयाभोवती असलेल्या आवरणाच्या पलीकडे खोलवर पसरली होती. तसेच श्वासनलिकेच्या दोन प्रमुख श्वसनमार्गांमध्ये विभाजन होते, तेथील खालच्या भागापर्यंत ती गाठ पोहोचली होती. हृदयातून रक्त वाहून नेणाऱ्या महाधमनीसह ( एओर्टा) आणि फुफ्फुसांकडे रक्त नेणाऱ्या प्रमुख धमनीजवळ ही गाठ असल्याने शस्त्रक्रियेतील धोका वाढला होता. अशा प्रकारची एवढ्या मोठ्या लांबीची 18 CM ची हृदयामागील थायरॉईड ग्रंथीची ही जगातली पहिली केस आहे.
या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेबाबत डॉ. राहुलकुमार एन. चव्हाण म्हणाले,रुग्णाच्या गाठीचे स्थान, तिचा आकार आणि प्रमुख रक्तवाहिन्यांच्या जवळ असल्याने केवळ मानेतून गाठ बाहेर काढणे सुरक्षित नव्हते. गाठ छातीच्या प्रवेशभागात घट्ट अडकलेली होती. तसेच इनोमिनेट व्हेन (प्रमुख शिरा) आणि महाधमनीचा कमानीसारखा भाग यांच्याजवळ गाठ असल्याने अत्यंत काळजीपूर्वक शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते.
ते पुढे म्हणाले, गाठ सुरक्षितपणे काढण्यासाठी गळ्यावर आडवा छेद देण्यासोबतच छातीच्या मध्यभागातील हाड उघडावे लागले. त्यामुळे गाठ आणि तिच्या आसपासच्या महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. गाठीभोवतीच्या ऊती काळजीपूर्वक बाजूला करून महत्त्वाच्या रक्तवाहिन्या सुरक्षित ठेवल्या. त्यानंतर गाठ हळूहळू मोकळी करून मानेच्या दिशेने आणली आणि पूर्णपणे काढली. या शस्त्रक्रियेत गाठ काढण्यासोबतच रक्तवाहिन्या, श्वासनलिका, मज्जातंतू आणि इतर महत्त्वाच्या अवयवांना इजा होणार नाही, याची विशेष काळजी घेणे आवश्यक होते.
गर्भावस्थेतील विकासादरम्यान गळ्यापासून छातीपर्यंतच्या मार्गावर थायरॉइडच्या अतिरिक्त ऊती राहिल्यामुळे अशा प्रकारची स्थिती निर्माण होऊ शकते. कालांतराने या ऊतींची वाढ होऊन छातीतील महत्त्वाच्या अवयवांवर दबाव येऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये या ऊतींमध्ये कर्करोगजन्य बदलही होऊ शकतात, *असे डॉ. चव्हाण यांनी स्पष्ट केले.*
सुमारे १० तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली. शस्त्रक्रियेनंतर रक्तातील कॅल्शियमची पातळी कमी होणे स्वर यंत्र ला जोडल्या जाणाऱ्या नसांना इजा होणे किंवा छातीशी संबंधित इतर गुंतागुंत आढळली नाही. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर सात दिवसांनी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
उपचारानंतर समाधान व्यक्त करताना श्रीमती दहिता जैतू म्हणाल्या, उपचारादरम्यान डॉक्टरांनी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आता माझी प्रकृती सुधारत असून याचा मला आनंद होत आहे.
मेडिकव्हर हॉस्पिटलचे महाराष्ट्र आणि कर्नाटक विभागाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल म्हणाले की, गुंतागुंतीच्या आजारांवरील उपचारांसाठी अनुभवी डॉक्टर, आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि संपूर्ण पथकातील समन्वय किती महत्त्वाचा असतो, हे या प्रकरणातून स्पष्ट होते. रुग्णाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचा आम्हाला आनंद आहे.
मेडिकव्हर हॉस्पिटल , नवी मुंबईचे सेंटर हेड संदीप जोशी यांनी सांगितले की, गुंतागुंतीच्या आजारांवर प्रभावी उपचार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत शस्त्रक्रिया सुविधा महत्त्वाच्या आहेत. डॉक्टरांना आवश्यक उपकरणे आणि तज्ज्ञांची मदत उपलब्ध करून देणे, जेणेकरून रुग्णांना दर्जेदार उपचार मिळतील, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.