‘खेळ पैठणी २०२६’मध्ये ललिता वैभव पाटील प्रथम... महेंद्रशेठ घरत व शुभांगीताई घरत यांच्यासह सर्वांसाठी सुख-समाधानाचे देवीचरणी साकडे....
उलवे / प्रतिनिधी : -
नवरात्रोत्सव म्हणजे भक्ती, शक्ती आणि संस्कृतीचा जागर, याच उत्सवी वातावरणात महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा आणि त्यांच्या उत्साहाला पैठणीची झळाळी देणारा उपक्रम म्हणजे यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था, शेलघर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘खेळ पैठणी २०२६’, रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, खेळातील चुरस आणि पैठणी जिंकण्याची उत्सुकता पाहायला मिळाली. या स्पर्धेत ललिता वैभव पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावून पैठणीचा मान मिळवला. मात्र, त्यांच्या विजयापेक्षाही विजयाच्या क्षणी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि सर्वांच्या सुख-समाधानासाठी देवीचरणी घातलेले साकडे अधिक भावस्पर्शी ठरले.
स्वतःच्या आनंदातही सर्वांच्या सुखाची प्रार्थना...
प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाल्यानंतर ललिता पाटील यांनी देवीचरणी प्रार्थना करताना महेंद्रशेठ घरत व शुभांगीताई घरत यांच्यासह सर्वांना सुख-समाधान लाभू दे, अशी मनापासून इच्छा व्यक्त केली. स्वतःच्या यशाचा आनंद साजरा करतानाही इतरांच्या जीवनात सुख नांदावे, ही भावना त्यांच्या शब्दांतून व्यक्त झाली. या प्रार्थनेतून घरत दाम्पत्याविषयीचा आदर, जिव्हाळा आणि सद्भावना दिसून आली.
पैठणी जिंकण्याचा आनंद एका क्षणाचा पण त्या आनंदात सर्वांच्या सुखाची प्रार्थना करण्याची भावना मनात कायमची घर करणारी ललिता पाटील यांच्या या भावनेने कार्यक्रमाला केवळ मनोरंजनाची नव्हे, तर सामाजिक जिव्हाळ्याचीही किनार लाभली.
महेंद्रशेठ घरत व शुभांगीताई घरत यांच्या टीमचे कौतुक
महेंद्रशेठ घरत व शुभांगीताई घरत हे स्वतः नवरात्रोत्सवाला उपस्थित नसतानाही त्यांच्या टीमने अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करून उत्सवाचे सुंदर आयोजन केले, असे गौरवोद्गार ललिता पाटील यांनी आपल्या मनोगतात काढले. कार्यक्रमाचे नियोजन, महिलांचा सहभाग आणि उत्सवातील उत्साह याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
उत्सव यशस्वी होण्यासाठी पडद्यामागे काम करणाऱ्या प्रत्येक हाताचे महत्त्व अधोरेखित करणारे त्यांचे हे मनोगत ठरले. आयोजकांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना त्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता उपस्थितांसाठीही विशेष भावणारी ठरली.