आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या निधीतून साकारलेल्या महर्षी वाल्मिकी समाज सभागृहाचे जयंतीदिनी लोकार्पण....
पनवेल (प्रतिनिधी) :
महर्षी वाल्मिकी जयंतीचे औचित्य साधून सोमवार, दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी वाल्मिकी नगर, पनवेल येथे आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून उभारण्यात आलेल्या महर्षी वाल्मिकी समाज सभागृहाचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. सायंकाळच्या प्रसन्न वातावरणात नागरिकांची मोठी उपस्थिती यावेळी लाभली या सभागृहामुळे परिसरातील नागरिकांना सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध सार्वजनिक उपक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
वाल्मिकी नगरमधील नागरिकांनी सामाजिक सभागृहाची मागणी केली होती. नागरिकांच्या या मागणीला प्रतिसाद देत क्षणाचाही विलंब न लावता ती मंजूर केल्याचे आमदार विक्रांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले. वाल्मिकी नगर हा आपला जुना प्रभाग असून, येथून नगरसेवक, त्यानंतर उपमहापौर आणि पुढे आमदार होण्याची संधी मिळाली. जनतेने दिलेल्या भरभरून प्रेमामुळे आणि कौटुंबिक जिव्हाळ्यामुळेच आपण आमदार होऊ शकलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
आमदार निधीतून साकारले सभागृह, महिलांसह नागरिकांना मिळाले हक्काचे व्यासपीठ..
आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून उभारण्यात आलेल्या या सभागृहाचा लोकार्पण सोहळा महर्षी वाल्मिकी जयंतीच्या दिवशी पार पडत असल्याने विशेष आनंद होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या सभागृहाचा उपयोग महिलांना विविध उपक्रम राबविण्यासाठी, महिला बचत गटांच्या बैठका घेण्यासाठी तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी करता येणार आहे. त्यामुळे परिसरातील महिला, सामाजिक संस्था आणि नागरिकांना एकत्र येऊन विविध उपक्रम राबविण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध झाली आहे.
“वाल्मिकी नगरच्या जनतेशी माझे नाते कौटुंबिक”
वाल्मिकी नगरमधील नागरिकांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा उल्लेख करताना आमदार विक्रांतदादा पाटील यांनी जनतेने आपल्यावर भरभरून प्रेम केले असल्याचे सांगितले. नागरिकांशी आपले नाते केवळ लोकप्रतिनिधी आणि मतदार एवढ्यापुरते मर्यादित नसून ते कौटुंबिक स्वरूपाचे आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आपल्या आमदारकीच्या प्रवासात वाल्मिकी नगरसह परिसरातील नागरिकांचे योगदान मोलाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
स्नेहलताई ढमाले पाटील, डॉ.सुरेखा मोहकर आणि मोहिनी पाटील यांच्या कार्याचा उल्लेख
यावेळी नगरसेविका स्नेहलताई ढमाले पाटील, डॉ. सुरेखाताई मोहकर आणि मोहिनीताई पाटील या परिसरातील विकासकामांसाठी सक्रियपणे कार्यरत असल्याचे आमदारांनी सांगितले. नागरिकांच्या प्रेमातून त्या जनतेची कामे ताकदीने करत असल्याचे आमदार विक्रांतदादा पाटील यांनी नमूद केले.
नागरिकांच्या वतीने मान्यवरांचा सन्मान
महर्षी वाल्मिकी जयंतीच्या मंगलमय वातावरणात पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्यादरम्यान वाल्मिकी नगरमधील नागरिकांच्या वतीने आमदार विक्रांतदादा पाटील, नगरसेविका स्नेहलताई ढमाले पाटील, माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहकर पाटील,मोहिनीताई पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. आमदारांच्या विकास निधीतून साकारलेल्या या सामाजिक सभागृहामुळे वाल्मिकी नगरमधील सामाजिक, सांस्कृतिक आणि महिला-केंद्रित उपक्रमांना मोठी चालना मिळणार असून, या सभागृहाचा नागरिकांना निश्चितच लाभ होईल, असे आमदार विक्रांतदादा पाटील यांनी मत व्यक्त केले.