तळोजा एमआयडीसीतील स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी महापौर नितीन पाटील यांचा पुढाकार...
तळोजा एमआयडीसीतील स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी महापौर नितीन पाटील यांचा पुढाकार

कंपनी प्रशासनासोबत घेतली बैठक,
स्थानिक युवकांना प्रथम प्राधान्य देण्याची मागणी

पनवेल /  प्रतिनिधी  -  : तळोजा एमआयडीसी परिसरातील स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या प्रमुख पुढाकाराने तसेच प्रमुख उपस्थितीत तळोजा एमआयडीसीतील विविध कंपन्यांच्या प्रशासनासोबत बैठक घेण्यात आली.

या बैठकीत स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देताना त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी कंपनी प्रशासनाकडे करण्यात आली. तळोजा एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर उद्योग कार्यरत असताना स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

तसेच कंपन्यांच्या CSR निधीचा उपयोग पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील संबंधित गावांच्या विकासासाठी तसेच शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी करण्यात यावा, अशी विनंतीही करण्यात आली.

स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योग आणि स्थानिक नागरिकांमध्ये समन्वय वाढवणे तसेच परिसराचा सर्वांगीण विकास साधणे, या उद्देशाने कंपनी प्रशासनाने सकारात्मक सहकार्य करावे, अशी अपेक्षा महापौर नितीन पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी प्रभाग समिती ‘अ’चे सभापती रविंद्र भगत, नगरसेवक नितेश पाटील,नगरसेविका विजयश्री संतोष (बुवा) पाटील, नगरसेवक दिनेश खानावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत, भाजप पदाधिकारी गणेश पाटील, विजय पाटील, वृषल पाटील तसेच इतर पदाधिकारी आणि विविध कंपन्यांच्या प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार आणि परिसराच्या विकासासाठी उद्योग प्रशासनाने सहकार्य करावे, यासाठी पुढील काळातही आवश्यक पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Comments