उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
बेकायदा व्यवसाय हटविण्याचीही मागणी
पनवेल, दि.२९ (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील उड्डाणपुलांखाली उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागांचा योग्य वापर करून नागरिक आणि मुला - मुलींसाठी क्रीडांगण व व्यायामाची सुविधा विकसित करावी, अशी मागणी प्रभाग क्रमांक १७ चे नगरसेवक अॅड. मनोज कृष्णाजी भुजबळ यांनी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पनवेल ते नवीन पनवेलला जोडणाऱ्या उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात मोकळी जागा असून, या ठिकाणी काही बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या जागेचा नियोजनबद्ध वापर केल्यास परिसरातील मुलांना आणि युवकांना खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध होऊ शकते. तसेच अनधिकृत व्यवसायांमुळे उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
उड्डाणपुलाखालील जागेवर फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, स्केटिंग यांसारख्या खेळांसाठी सुविधा उभारण्यासोबतच लहान मुलांसाठी खेळण्याची जागा आणि नागरिकांसाठी व्यायामाची साधने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासाठी संबंधित जागांची पाहणी करून आवश्यक सर्वेक्षण करावे तसेच शक्य असलेल्या ठिकाणी सुरक्षित व सर्वसमावेशक क्रीडांगणे विकसित करावीत. मैदानासाठी योग्य फ्लोअरिंग, प्रकाश व्यवस्था, संरक्षक जाळी, बाके, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही भुजबळ यांनी केली आहे.
महापौर कार्यालयात हे निवेदन साद करण्यात आले असून, मागणीचा सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे.
फोटो : मनोज भुजबळ