रुग्णालयातून घरी गेल्यानंतर उपचारांसाठी मेडिकव्हरचा ‘होमवॉर्ड’ उपक्रम..
रुग्णालयातून घरी गेल्यानंतर उपचारांसाठी मेडिकव्हरचा ‘होमवॉर्ड’ उपक्रम

भारतातील पहिलाच उपक्रम ज्यात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक उपचार, वैद्यकीय उपकरणे आणि विशेष मदत रुग्णांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचविणार
नवी मुंबई / पनवेल वैभव  -  : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढील उपचारांची आणि रुग्णाची काळजी घेण्याची जबाबदारी ही त्या रुग्णाच्या कुटुंबीयांवर येते. गंभीर आजारातून बरे होत असलेल्या रुग्णांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणे, रुग्णाचा प्रकृतीची विशेष देखभाल किंवा विशेष रुग्णसेवेची गरज असल्यास ही जबाबदारी आणखी वाढते. अशा वेळी रुग्णालयातून घरी गेल्यानंतरची उपचारपद्धती अधिक सोपी आणि नियोजनबद्ध व्हावी, यासाठी नवी मुंबईतील खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलने ‘होमवॉर्ड’ हा नवा उपक्रम सुरू केला आहे.भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम रुग्णांसाठी राबविला जात आहे.

‘होमवॉर्ड’ अंतर्गत रुग्णालयातील डॉक्टर आणि ज्युपिटर इक्विपमेंट या वैद्यकीय उपकरणांच्या टीमच्या समन्वयातून रुग्णाच्या वैद्यकीय गरजेनुसार घरच्या घरी उपचारांची योजना तयार केली जाणार आहे. डिस्चार्जपूर्वी डॉक्टर रुग्णाची स्थिती आणि त्याला आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधांचे मूल्यांकन करतील. त्यानुसार आवश्यक उपकरणे आणि घरगुती उपचारांची व्यवस्था केली जाईल. रुग्ण रुग्णालयातून घरी परतण्यापूर्वी, शक्यतो एक दिवस आधीच घरात आवश्यक उपकरणे आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

गंभीर आजारातून बरे होत असलेले तसेच ट्रॅकिओस्टॉमी म्हणजेच श्वसनमार्ग मोकळा करण्यासाठी घशाच्या पुढच्या बाजूला (श्वसननलिकेवर) शस्त्रक्रिया करून केलेले एक लहान छिद्र असून त्याची देखभाल किंवा विशेष वैद्यकीय उपकरणांची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे. रुग्णाची प्रकृती आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही घरगुती देखभाल १५ ते ३० दिवसांपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. यामध्ये डॉक्टरांनी सुचविलेली उपचारपद्धती, आवश्यक वैद्यकीय उपकरणे, विशेष प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मदत तसेच रुग्णालय, वैद्यकीय पथक, घरगुती उपचार करणारे कर्मचारी आणि कुटुंबीय यांच्यातील समन्वयाचा समावेश असेल. त्यामुळे रुग्णाला रुग्णालयातून घरी आल्यानंतरही उपचारांमध्ये सातत्य राखता येणार आहे.

 मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे महाराष्ट्र आणि कर्नाटक विभागाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल म्हणाले, डिस्चार्जनंतरचा काळ हा रुग्णाच्या बरे होण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र, रुग्णालयातून घरी गेल्यानंतर पुढील उपचार आणि काळजीबाबत रुग्ण व कुटुंबीयांमध्ये अनेकदा संभ्रम असतो. ‘होमवॉर्ड’च्या माध्यमातून हा काळ अधिक नियोजनबद्ध आणि रुग्णकेंद्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. रुग्णालयातील उपचारानंतरही योग्य वैद्यकीय मार्गदर्शन मिळत राहावे आणि रुग्णाचा पुनर्वसनाचा प्रवास अधिक सुरळीत व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

 मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबईचे सेंटर हेड संदीप जोशी म्हणाले,* रुग्ण रुग्णालयातून घरी गेल्यानंतर त्याची बरे होण्याची प्रक्रिया थांबत नाही. त्यानंतरचे काही दिवस पूर्णपणे बरे होण्यासाठी महत्त्वाचे असतात. या काळात रुग्ण आणि कुटुंबीयांना आवश्यक वैद्यकीय मदत आणि मार्गदर्शन मिळावे, यासाठी ‘होमवॉर्ड’ची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णाला हळूहळू आणि आत्मविश्वासाने त्याच्या दैनंदिन आयुष्य पुर्ववत करण्यास मदत होईल.

 सागर शशिकांत खोना(मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्युपिटर इक्विपमेंट) सांगतात की,*  होमवॉर्डच्या माध्यमातून मेडिकव्हर हॉस्पिटल्ससोबत काम करताना आम्हाला खुप आनंद होतोय. रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी होणाऱ्या पुढील उपचारांसाठी आधीपासून तयारी करणे किती महत्त्वाचे आहे, हे या माध्यमातून अधोरेखित केले जाते. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलेली आवश्यक वैद्यकीय उपकरणे रुग्णाला डिस्चार्ज मिळण्यापूर्वीच उपलब्ध करून दिल्याने, रुग्ण घरी परतल्यापासूनच कुटुंबीयांना आवश्यक वैद्यकीय मदत आणि सुविधा योग्य वेळी मिळू शकतात. या सहकार्याचा उद्देश रुग्णालयातून घरी परतण्याची प्रक्रिया अधिक सुरळीत, नियोजनबद्ध आणि रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांसाठी अधिक दिलासादायक करणे हा आहे.
Comments