कामोठे कॉलनी फोरमचे दूषित पाण्याविरोधात सिडकोला निवेदन....
कामोठे कॉलनी फोरमचे दूषित पाण्याविरोधात सिडकोला निवेदन....

पनवेल / प्रतिनिधी  : -
कामोठे शहरातील विविध सेक्टरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गढूळ, पिवळसर व दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर कामोठे कॉलनी फोरमच्या वतीने आज सिडको पाणी पुरवठा विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री.चहारे यांना निवेदन देण्यात आले. 

नागरिकांनी साठवलेल्या पाण्याचे फोटो व व्हिडिओ समोर आले असून पाण्यामध्ये गाळ व इतर अशुद्ध घटक आढळत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारच्या दूषित पाण्याचा वापर पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी तसेच दैनंदिन गरजांसाठी करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा गंभीर फटका बसण्याची शक्यता आहे.

कामोठे कॉलनी फोरमने सिडको प्रशासनाकडे पाणीपुरवठा यंत्रणेची तात्काळ तपासणी करण्याची मागणी केली असून विविध सेक्टरमधील सोसायटी मधील पाण्याचे नमुने NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून त्याचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकारासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करून नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

तसेच कामोठे शहराला सिडकोकडून पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्यामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांचे टँकर वर लाखो रुपये खर्च होत आहेत, त्यामुळे सिडको कडून पाणी पुरवठ्यामध्ये वाढ करण्याची मागणी सुद्धा बैठकी दरम्यान करण्यात आली. 

याबाबत सिडको प्रशासनाने तातडीने खुलासा करून स्वच्छ पाणी पुरवठ्याबाबत योग्य उपाययोजना कराव्यात. अन्यथा कामोठेतील नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा कामोठे कॉलनी फोरमचे अध्यक्ष मंगेश अढाव यांनी दिला आहे.

यावेळी कामोठे कॉलनी फोरम महिला अध्यक्षा जयश्री झा, सचिव बापू साळुंखे, अर्पिता वाणी, शीतल पाटील,सुनील आडे , संतोष नायर, मनोहर पवार तसेच शहरातील काही सोसायटींचे पदाधिकारी उपस्थित होते. 
Comments