कळंबोलीत उघड्यावर कचरा टाकणाऱ्याला बसला भुर्दंड; पालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याने आरोपी पोलिसांच्या स्वाधीन...
कळंबोलीत उघड्यावर कचरा टाकणाऱ्याला बसला भुर्दंड; पालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याने आरोपी पोलिसांच्या स्वाधीन


पनवेल , दि.०४ ( वार्ताहर ) :  शहरात स्वच्छता राखण्यासाठी आणि उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आज, गुरुवार दिनांक ४ जून २०२६ रोजी कळंबोली प्रभाग क्र. १० मधील 'केएलई (KLE) कॉलेज कॉर्नर' येथे उघड्यावर कचरा टाकणाऱ्या एका बेजबाबदार नागरिकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, कारवाई दरम्यान या व्यक्तीने पालिका कर्मचाऱ्यांना वाईट शब्द वापरून हुज्जत घातल्याने त्याला थेट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
                    मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी पालिकेचे पथक तैनात होते. दरम्यान, केएलई कॉलेज कॉर्नर परिसरामध्ये कचरा टाकत असताना संबंधित व्यक्तीला पथकाने रंगेहात पकडले आणि नियमानुसार त्याला फाईन (दंड) ठोठावला. दंडाची कारवाई करत असताना संबंधित व्यक्तीने प्रशासकीय कामात अडथळा आणत उपस्थित कर्मचाऱ्यांशी वाद घातला आणि अत्यंत वाईट शब्द (शिवीगाळ) वापरले. शासकीय कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वच्छता पथकाने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून त्या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केले. या धडक कारवाई दरम्यान स्वच्छता निरीक्षक दिग्नेश भोईर, साईगणेश सुपरवायझर रसूल बागवान आणि प्रवीण पाटील हे प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित होते. कळंबोली परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, उघड्यावर कचरा टाकू नये, अन्यथा अशाच प्रकारची कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई पुढेही सुरू राहील, असा कडक इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
फोटो - कचरा कारवाई
Comments