नेरेपाडा येथे हरिश्चंद्रगडाच्या केदारेश्वर गुफेची गणपती बाप्पांसाठी आकर्षक प्रतिकृती
पनवेल / प्रतिनिधी - :
गणेशोत्सवानिमित्त यंदा भक्तांना धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडवून देण्यासाठी हरिश्चंद्रगडावरील प्रसिद्ध केदारेश्वर महादेव गुफेची हुबेहुब प्रतिकृती नेरेपाडा येथील पत्रकार मयुर तांबडे, पंकज तांबडे यांच्या घरी उभारण्यात आली आहे. या आकर्षक देखाव्यात गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.
हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध गिरिदुर्ग असून येथील. केदारेश्वर गुफा आणि त्यातील शिवलिंग विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. याच ऐतिहासिक वास्तूची प्रतिकृती गणेशोत्सवाच्या देखाव्यात साकारण्यात आली आहे.
गुफेची रचना, दगडी स्वरूप, परिसरातील वातावरण आणि केदारेश्वर महादेवाचे धार्मिक महत्त्व यांचा सुंदर मिलाफ या देखाव्यात करण्यात आला आहे. त्यामुळे गणपती बाप्पाच्या दर्शनासोबतच हरिश्चंद्रगडाच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाची माहितीही नागरिकांना मिळत आहे. विशेष म्हणजे, गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड-किल्ले, मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तूंची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे पंकज तांबडे यांनी सांगितले. हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.
धार्मिक श्रद्धा, ऐतिहासिक वारसा आणि कलात्मकता यांचा सुंदर संगम असलेला हा देखावा यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरत आहे.