राष्ट्रीय लोक अदालतीत पनवेल तालुक्याची उल्लेखनीय कामगिरी
सहा हजार २७ प्रकरणे सामंजस्याने निकाली; ४४ कोटी ६४ लाखांहून अधिक रकमेची तडजोड
पनवेल , दि. १५ सप्टेंबर :
रायगड-पनवेल न्यायालयात प्रलंबित तसेच दाखलपूर्व वादांचा जलद, सुलभ आणि सामंजस्यपूर्ण निपटारा व्हावा, पक्षकारांचा वेळ व खर्च वाचावा आणि परस्पर संवादातून वादांना कायमस्वरूपी पूर्णविराम मिळावा, या उद्देशाने पनवेल येथील जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या राष्ट्रीय लोक अदालतीत दाखलपूर्व व प्रलंबित अशी एकूण ६ हजार २७ प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली असून, रुपये ४४ कोटी ६४ लाख ५७ हजार ६३२ इतक्या रकमेची तडजोड झाली.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा रायगड जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती मा. न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा रायगड जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती मा. न्यायमूर्ती अद्वैत सेठना, तसेच रायगड-अलिबागचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन मा. न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्या शुभहस्ते दृकश्राव्य माध्यमातून झाले. यावेळी पनवेल न्यायालयातील न्यायिक अधिकारी, माननीय श्री. विमलनाथ तिवारी साहेब — जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश १ तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, पनवेल, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. रत्नदीप पाटील व इतर कार्यकारणी उपस्थित होती. रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील न्यायिक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, तालुका वकील संघटनांचे पदाधिकारी व अधिवक्तेही दृकश्राव्य माध्यमातून सहभागी झाले.
पनवेल न्यायालयात सात लोक अदालत कक्ष
राष्ट्रीय लोक अदालतीसाठी पनवेल न्यायालयात एकूण ०७ लोक अदालत कक्ष स्थापन करण्यात आले होते. या कक्षांमध्ये पुढील न्यायिक अधिकाऱ्यांनी कामकाज पाहिले :
- मा. एस. आर. चव्हाण — जिल्हा न्यायाधीश - २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पनवेल
- श्री. डी. एम. डोंगरे — दुसरे सह दिवाणी न्यायाधीश व स्तर, पनवेल
- श्री. आर. एन. चव्हाण — सहावे सह दिवाणी न्यायाधीश व स्तर, पनवेल
- श्रीमती ए. एस. वाडकर — आठवे सह दिवाणी न्यायाधीश व स्तर, पनवेल
- श्री. आर. वाय. खंडारे — पाचवे सह दिवाणी न्यायाधीश व स्तर, पनवेल
- श्रीमती पी. के. राठोड — सातवे सह दिवाणी न्यायाधीश व स्तर, पनवेल
- श्रीमती एस. यू. जागुष्टे — सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, पनवेल
तसेच संबंधित कक्षांमध्ये पुढील वकिलांनी पंचांची भूमिका म्हणून काम पाहिले :
ॲड. इंद्रजित भोसले, ॲड. भूषण म्हात्रे, ॲड. शशिकांत म्हात्रे, ॲड. प्रज्ञा भगत, ॲड. अदील चौधरी, ॲड. सुयश कामेरकर आणि ॲड. सुनील तोटावाड यांनी पंचांची भूमिका बजावली.
१५ हजार २३५ प्रकरणे लोक अदालतीसमोर
राष्ट्रीय लोक अदालतीसमोर ७ हजार ७१८ दाखलपूर्व आणि ७ हजार ५१७ न्यायालयीन प्रलंबित, अशी एकूण १५ हजार २३५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १ हजार ९४९ दाखलपूर्व आणि ४ हजार ०७८ प्रलंबित, अशी एकूण ६ हजार २७ प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली.
दाखलपूर्व प्रकरणांमध्ये रुपये ३८ लाख ७० हजार २५८, तर प्रलंबित प्रकरणांमध्ये रुपये ४४ कोटी २५ लाख ८७ हजार ३७४ इतक्या रकमेची तडजोड झाली. अशा प्रकारे एकूण रुपये ४४ कोटी ६४ लाख ५७ हजार ६३२ इतक्या विक्रमी रकमेची तडजोड करण्यात आली.
व्हिडिओ कॉलद्वारेही प्रकरणांचा निपटारा
आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत आवश्यक त्या प्रकरणांमध्ये पक्षकारांना प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहण्याची सक्ती न करता व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद व आवश्यक पडताळणी करून प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. त्यामुळे दूरवर असलेल्या किंवा अपरिहार्य कारणांमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकणाऱ्या पक्षकारांनाही लोक अदालतीच्या माध्यमातून वाद मिटविण्याची संधी मिळाली.
पनवेल बार असोसिएशनने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पक्षकारांमध्ये तडजोड घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
राष्ट्रीय लोक अदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी अधीक्षक नाचण मॅडम, वरिष्ठ लिपीक श्री. हेमंत अंबेतकर, कनिष्ठ लिपीक श्री. राहुल चव्हाण, विधी स्वयंसेवक श्री. शैलेश कोंडसकर, अधिवक्ते, न्यायालयीन कर्मचारी, पोलिस कर्मचारी तसेच पक्षकारांनी मोलाचे सहकार्य केले.
सर्वांच्या समन्वित प्रयत्नांमुळे मोठ्या संख्येने प्रकरणांचा जलद व सामंजस्यपूर्ण निपटारा शक्य झाला. या सहकार्याबद्दल तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश १ श्री. विमलनाथ तिवारी यांनी सर्वांचे आभार मानले.