नेरुळ येथे पावसासाठी विशेष नमाज-ए-इस्तिस्का; मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती
नवी मुंबई, दि. २१ जून २०२६ :
पावसाच्या आगमनासाठी, देशात शांतता, सुव्यवस्था, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी नेरुळ येथे विशेष नमाज-ए-इस्तिस्का अदा करण्यात आली. यशवंतराव चव्हाण क्रीडांगण, सेक्टर-१९, नेरुळ (पूर्व), नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या या सामूहिक प्रार्थनेत मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
नमाजेनंतर उपस्थितांनी अल्लाह तआलाकडे रहमतमय व लाभदायक पावसासाठी, देशात अमन-शांती नांदण्यासाठी, जनतेच्या सुख-समृद्धीसाठी तसेच शेतकऱ्यांच्या मेहनतीला यश मिळण्यासाठी विशेष दुआ केली.
या प्रसंगी उपस्थितांना एकता, बंधुभाव, मानवता आणि सामूहिक प्रार्थनेचे महत्त्व सांगण्यात आले. "पाऊस हा केवळ पाणी नसून शेतकऱ्यांच्या भविष्याचा आधार आहे," असा संदेश देत सर्वांनी एकजुटीने प्रार्थना केली.
हाजी शहनवाज खान यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजातील विविध स्तरातील नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होत सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश दिला.
अल्लाह तआला सर्वांच्या दुआ स्वीकारो, महाराष्ट्रासह संपूर्ण देशावर भरपूर, लाभदायक आणि रहमतमय पाऊस बरसवो, अशी प्रार्थना करण्यात आली.