पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ;
राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप
पनवेल / प्रतिनिधी.
"मैत्री हेच जीवन" हा संदेश समाजाला देत सामाजिक उपक्रमात सातत्याने अग्रस्थानी असणारी पनवेलची गोल्डन ग्रुप या संस्थेच्या वतीने शनिवार दिनांक २० जून रोजी शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप करण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेच्या रिटघर येथील शाळेमध्ये गोल्डन ग्रुप सदस्यांनी सदर वाटप केले. या कार्यक्रमाला रिटघर ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष पुंडलिक भोपी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग भोपी यांनी गोल्डन ग्रुप पदाधिकारी व सदस्यांचे स्वागत केले.गोल्डन ग्रुपचे अध्यक्ष वसंत भगत आणि आधारस्तंभ निळकंठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली हे वाटप संपन्न झाले. गोल्डन ग्रुपच्या वतीने रीटघर शाळेतील १६१ विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना बटन छत्रीचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना वह्या पेन, पेन्सिल, खोडरबर,शार्पनर, पट्टी असे शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. सरपंच सुभाष भोपी यांनी गोल्डन ग्रुप करत असलेल्या समाजकार्याबद्दल आणि रिटघर राजिप शाळेत छत्री वाटप केल्याबद्दल या संस्थेची प्रशंसा केली तसेच आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गोल्डन ग्रुपचे सदस्य मंदार दोंदे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मित्र आणि मैत्री जपण्याचा कानमंत्र दिला. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात आई-वडील, शिक्षक आणि मित्र हे जपलेच पाहिजेत असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अथक परिश्रम घेणारे अध्यक्ष वसंत भगत यांचा शिक्षक वृंदाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सरपंच सुभाष भोपी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग भोपी, निळकंठ भगत, वसंत भगत, पत्रकार विवेक पाटील, पत्रकार मंदार दोंदे, विजय पाटील, विजय पवार, अमोल गोवारी, संजय कोलकर, प्रसाद गायकवाड,किशोर थळे, विजय रेवसकर,श्रीमंत चिलवंत, श्रुती कोंडिलकर, कविता थळे, वैशाली पाटील, सुप्रिया नवले, देविदास भोपी यांची उपस्थिती होती.
चौकट:
दिलदार मित्रांच्या सजग संस्थेने यापूर्वी समाजातील अंतिम घटकाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी अनेक उत्तमोत्तम उपक्रम राबविले आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या गरजवंत शाळांना वर्ग उभारून देणे, रंगरंगोटी करून देणे, छप्पर बसून देणे, कपाटे भेट देणे अशा अनेक उपक्रमामुळे गोल्डन ग्रुप संस्था नावाजली गेली आहे.तसेच त्या संस्थेने विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप देखील केलेले आहे.