भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पनवेल दक्षिण मंडळाची नियोजन बैठक संपन्न..
पनवेल, दि. १४ जून : भारतीय जनता पार्टी पनवेल दक्षिण मंडळाची महत्त्वपूर्ण नियोजन बैठक रविवार दि. १४ जून २०२६ रोजी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृह, मार्केट यार्ड, पनवेल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. भाजप नेते तथा पनवेल महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.
बैठकीमध्ये केंद्रातील मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या यशस्वी १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. तसेच वृक्षारोपण अभियान, आंतरराष्ट्रीय योग दिन, आणीबाणी स्मृती दिन, बूथ सक्षमीकरण अभियान आणि पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संघटन हेच पक्षाचे खरे सामर्थ्य असल्याचे सांगितले. प्रत्येक शक्तिकेंद्र, बूथ आणि प्रभाग स्तरावर पक्षाची विचारधारा तसेच केंद्र व राज्य सरकारच्या जनहिताच्या योजना प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक सक्रियपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी, जनसंपर्क वाढ, नवीन कार्यकर्त्यांचा सहभाग, युवा वर्गाशी संवाद आणि सोशल मीडियाच्या प्रभावी वापराबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये जनसहभाग वाढविणे आणि भाजपचे विकासाभिमुख नेतृत्व अधिक बळकट करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीस पनवेल दक्षिण तालुका अध्यक्ष मंगेश वाकडीकर, मा. पंचायत समिती सदस्य जगदीश पवार, पनवेल दक्षिण मंडळ सरचिटणीस किरण माळी, सुनील गवंडी व प्रफुल्ल पाटील, केळवणे जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष विद्याधर जोशी, गुळसुंदे जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष अविनाश गाताडे, पळस्पे जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष विजय गवंडी, आपटा पंचायत समिती अध्यक्ष संदीप पाटील, केळवणे पंचायत समिती अध्यक्ष सुशील ठाकूर, पोयंजे पंचायत समिती अध्यक्ष मंगेश लबडे, गुळसुंदे पंचायत समिती अध्यक्ष प्रतीक भोईर तसेच पळस्पे पंचायत समिती अध्यक्ष गोरक्षनाथ धुमाळ यांच्यासह मंडळ पदाधिकारी, मोर्चांचे अध्यक्ष व सरचिटणीस, विविध सेलचे पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत आगामी सर्व पक्षीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या विकासयात्रेची माहिती घराघरात पोहोचविण्याचा आणि संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.