को.म.सा.प आणि के गो लिमये वाचनालय व ग्रंथालय आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा व कवि संमेलन संपन्न ...
ज्ञानपीठ सारखा पुरस्कार मिळाला नाही, तरी लिहिणे थांबवू नये - को.म.सा.प विश्वस्त एल.बी.पाटील

आप्पासाहेब पवार लिखित 'सुखाचे सोबती' व प्रीतिसंगम या कादंबऱ्यांचा प्रकाशन सोहळा संपन्न...

पनवेल दि.८(प्रतिनिधी):"वास्तववादी साहित्य हे शास्वत साहित्य आहे.लेखकाचा अनुभव ज्या साहित्यकृतीत प्रामाणिकपणे व्यक्त होतो,तेथेच खरे ज्ञानपीठ आहे.त्यामुळे एखाद्या लेखकाच्या साहित्यकृतीला ज्ञानपीठ सारखा पुरस्कार मिळाला नाही,तरी त्याने लिहिणे थांबवू नये.सतत लिहिते राहावे." असे बहुमोल मार्गदर्शन समारंभाचे अध्यक्ष रायगड भूषण व को.म.सा.प.चे विश्वस्त एल.बी.पाटील यांनी समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून भाषण करताना केले.येथील तथास्तु हॉलमध्ये झालेल्या आप्पासाहेब पवार यांच्या" सुखाचे सोबती" व "प्रीतीसंगम"या कादंबऱ्यांच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
      कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा- पनवेल व के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय,पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सर्वप्रथम को.म.सा.प. पनवेल शाखेचे अध्यक्ष सुभाष कुडके यांनी प्रास्ताविक केले.पुस्तक-प्रकाशनानंतर विविध नामवंत वक्त्यांची समायोजित भाषणे झाली.लेखक अप्पासाहेब पवार यांनी आपल्या कादंबरी लेखनामागील भूमिका समजावून सांगितली. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अविनाश पाटील यांनी 'प्रीतीसंगम'या कादंबरीचे रसग्रहण करताना त्यातील सौंदर्य-स्थळे उलगडून दाखवली. ज्येष्ठ साहित्यिका सौ.मीनल वसमतकर यांनी सातव्या शतकातील 'बाण भट्टाच्या 'कादंबरी' पासून आढावा घेत 'सुखाचे सोबती' या कादंबरीचा आशय, लेखन-शैली, पात्रयोजना,कथानकाची मांडणी, समाजाला दिलेला संदेश याबद्दल भाष्य केले. को.म.सा.प.चे केंद्रीय जिल्हा प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी यांनी पुस्तकाचे अंतरंग, बहिरंग व मुखपृष्ठ याबद्दल माहिती दिली. ज्येष्ठ कवी,गझलकार व समीक्षक रोहिदास पोटे यांनी अप्पासाहेबांच्या कादंबऱ्या वास्तववादी, भावनाप्रधान व प्रणयप्रदान असल्याचे सांगितले. ज्येष्ठ साहित्यिका व माजी जिल्हाध्यक्ष को.म.सा.प. ॲड. सुनीता जोशी यांनी अप्पासाहेबांनी प्रदीर्घ तरीही रोचक कादंबऱ्या लिहिल्याबद्दल त्यांचे भरभरून कौतुक केले.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ.श्रद्धा तारे यांनी अभिनव पद्धतीने व लालित्यपूर्ण केले. तसेच त्यांनी सर्व मान्यवरांचा परिचय ओघवत्या भाषेत करून दिला. 
     कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिवाजी मोटे यांनी जिव्हाळ्याने केले.
     या प्रमुख कार्यक्रमानंतर श्री. नागनाथ डोलारे यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलन झाले.त्यात १४ मान्यवर कवींनीआपल्या रसाळ कविता सादर केल्या.
     या कार्यक्रमास कवयित्री सौ. रंजना करकरे, सौ.स्मिता गांधी, को.म.सा.प.चे सचिव विजय गायकर,ज्येष्ठ कवी वैशंपायन, ज्येष्ठ नागरिक दत्तात्रेय जाधव, वाचनालयाच्या सचिव सौ.जयश्री शेटे, राजकुमार ताकमोगे हे मान्यवर उपस्थित होते.
Comments