महिलेची हत्या करण्यामध्ये आरोपीसोबत सहभागी असलेल्या प्रेमिकेस गुन्ह्यातील गाडीसह घेतले ताब्यात
पनवेल, दि.13 (संजय कदम) ः तब्बल दोन महिन्यांपूर्वी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून आरोपीला अटक करण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले आहे. करण नामदेव पाटील (राहणार फडके पाडा, शिळफाटा ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. अधिक तपासात या गुन्ह्यातील आरोपीबरोबर त्याची अजून एक प्रेमिका सुद्धा सहभागी होती. तिला सुद्धा गुन्ह्यात वापरलेल्या चार चाकी गाडीसह पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
11 एप्रिल रोजी पनवेल तालुका पोलिसांना चिंचवली जवळील पनवेल दुन्द्रे रस्त्याच्या वनविभागाच्या जागेत झुडपामध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू केले. या महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन शोध घेतला. मात्र तिची ओळख पटली नाही. पोलिसांनी तब्बल 200 पेक्षा अधिक मिसिंग महिलांची पडताळणी केली. त्यासोबत पोलिसांचा तांत्रिक तपास सुरू केला. यावेळी हत्या झालेल्या महिलेच्या वर्णनासोबत एका महिलेची माहिती प्राप्त झाली आणि पोलिसांनी त्यानुसार आपला तपास सुरू केला. यावेळी शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनिता देवी भगवान राजभर (वय 30) या महिलेची ओळख पटली. तालुका पोलिसांनी या महिलेच्या संपर्कात असलेल्या इसमाला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल फोन बाबत तपास केला असता तो मयत महिलेचे संपर्कात असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता या अनिता देवी राजभर या महिलेने त्याच्यासोबत लग्नाचा तगादा लावला होता आणि त्याला तिच्यासोबत लग्न करायचे नसल्याने करण पाटील याने 6 एप्रिल रोजी तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह कारमधून चिंचवली गावचे हद्दीत आणून कार मधील पेट्रोल काढले आणि ते तिच्या प्रेतावर टाकून तिला जाळून टाकले.
गेल्या दोन महिन्यांपासून सदर तपास करत असताना पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, सहा.पो.आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि गजानन घाडगे, पो.नि.आनंद कांबळे, यांच्या सुचनेनुसार पो.उपनिरीक्षक दिपक शेळके, हर्षल राजपूत, अभिजीत व्हरांबळे, पो.अंमलदार सुनील कुदळे, आकाश भगत, शिवाजी बाबर, सतीश तांडेल, विजय देवरे, विकास साळवी, जयदीप पवार, भानुदास मोटे, भुषण म्हारसे, भिमराव खताळ आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे व गुप्त बातमीद्वाराद्वारे सदर आरोपीला गजाआड करण्यात यश मिळविले होते. दरम्यान अधिक तपासात या आरोपीबरोबर त्याची दुसरी प्रेमिका सुरेखा सिंग (21 रा.शिळफाटा) ही सुद्धा सहभागी होती व तिच्या समोरच सदर महिलेला जाळण्यात आले होते. त्याचप्रमाणे या महिलेचा मृतदेह आणण्यासाठी आरोपीने वापरलेली मित्राची गाडी व लोखंडी रॉड हा सुद्धा पनवेल तालुका पोलिसांनी हस्तगत केला आहे.
फोटो ः गुन्ह्यात वापरलेली गाडी