उपद्रवी लोकांमुळे देशाची नाचक्की
झालेला प्रकार म्हणजे पूर्वनियोजित षडयंत्र ; अरिहंत डेव्हलपर्सचे अशोक छाजेड यांची स्पष्टोक्ती
सुप्रसिद्ध विकसक अरिहंत डेव्हलपर्सचे संचालक अशोक छाजेड यांनी त्यांच्याविरुद्ध वायरल होत असलेल्या व्हिडिओचे बाबत आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले आहे की हा सगळा प्रकार म्हणजे पूर्वनियोजित षडयंत्र असून त्या पाठीमागे पाण्याची समस्या सोडवण्याची सजग वृत्ती दिसून येत नाही. सदर व्हिडिओ खरा असून त्या पाठीमागील पार्श्वभूमी आणि उपद्रव निर्माण करणाऱ्या व्यक्तींचे वास्तव जाणून घेण्याच्या उद्देशाने त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली आहे.
खारघर येथील अरिहंत डेव्हलपर्स यांनी विकसित केलेल्या अरिहंत आलिशान या संकुलामध्ये आजमितीला ३८० कुटुंबे राहतात परंतु हा व्हिडिओ बनविण्याच्या उद्देशाने उपद्रव निर्माण करणाऱ्या केवळ १५ ते २० व्यक्ती सदर व्हिडिओ मध्ये दिसतात. सदर घटना ही संपूर्णपणे पूर्वनियोजित होती. अशोक छाजेड हे येथील क्लब हाऊस मध्ये NAREDCO NMR रायगड यांच्या वतीने आयोजित एका चर्चासत्र कार्यक्रमाचे करता आले होते. विशेष उल्लेखनीय म्हणजे या कार्यक्रमात परदेशातून आलेल्या काही पाहुण्यांसोबत त्यांची अत्यंत महत्त्वाची चर्चा सुरू होती. पाण्याच्या समस्या संदर्भात काही लोक भेटू इच्छित आहेत असे समजल्यावर हे चर्चासत्र अत्यंत महत्त्वाचे असून त्यांची समस्या निराकारण करण्याकरता मी संध्याकाळी सहा नंतर नक्की भेटेन असा निरोप अशोक छाजेड यांनी पाठविला. आलेली परदेशी पाहुणे मंडळी या क्षेत्रातील तज्ञ असून त्यांनी इथे उपस्थित राहणे हा आपल्या देशाच्या दृष्टीने सन्मानाचा भाग आहे त्यामुळे त्यांच्या समावेत नियोजित केलेले चर्चासत्र पूर्ण होऊ दे! मग मी अवश्य तुमची भेट घेतो असे देखील छाजेड यांनी कळविले.
या पार्श्वभूमीवर आलेल्या मंडळींना केवळ उपद्रव निर्माण करून या चर्चासत्रामध्ये विघ्न आणायचे होते. या मंडळींना समस्या केंद्रित चर्चा करायची नसून केवळ हैदोस घालणं हा एकमेव त्यांचा उद्देश होता. त्यांचा पूर्वग्रहदोषित डाव लक्षात आल्याने अशोक छाजेड यांनी अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम अर्धवट टाकून तेथून निघून जाणे पसंत केले.या लोकांनी अशोक छाजेड यांचीच गाडी अडविली नाही तर त्यांनी परदेशी पाहुण्यांच्या गाड्या देखील अडवून ठेवल्या. झाल्या प्रकाराने परदेशी पाहुणे भयभीत झाले आणि रिक्षा पकडून कार्यक्रम स्थळाहून निघून गेले.
उपद्रव निर्माण करणाऱ्या लोकांच्या बाबत पुढे स्पष्टीकरण देताना अशोक छाजेड म्हणाले की एक विकसक म्हणून अरिहंत आलिशानमधील प्रत्येक घरात नळ जोडणी आम्ही करून दिलेली आहे. मुबलक पाणीपुरवठा करणं ही पनवेल महानगरपालिकेची जबाबदारी आहे. पावसाला विलंब झाल्यामुळे संपूर्ण महानगरपालिका क्षेत्राला पाण्याच्या दुर्भिक्ष जाणवत आहे. अशा परिस्थितीत देखील टँकरच्या माध्यमातून अरिहंत आलिशान या संकुलाला पाणीपुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न असतो. अरिहंत आलिशान या ठिकाणी एसटीपी प्लांट आणि आरओ प्लांट यापूर्वीच कार्यान्वित झालेले आहेत.
नियोजित षडयंत्रातून अरिहंत डेव्हलपर्स आणि परदेशी पाहुण्यांच्या चर्चासत्राला बदनाम करण्याच्या प्रयत्नामुळे देशाच्या सन्मानाला देखील धक्का लागलेला आहे.
अशोक छाजेड अखेरीस म्हणाले की ज्या प्रकारे शेतकरी मेहनत करून समाजाच्या पोटाची भूक मिटवत असतात त्याचप्रकारे विकासक देखील मेहनत करून अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांपैकी निवारा देत सामाजिक कार्य करत असतात याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे.