मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दुर्मीळ ब्रेन स्ट्रोकवर यशस्वी उपचार ; ५४ वर्षीय महिलेचा गंभीर अपंगत्वाचा धोका टळला ...
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दुर्मीळ ब्रेन स्ट्रोकवर यशस्वी उपचार ; ५४ वर्षीय महिलेचा गंभीर अपंगत्वाचा धोका टळला 
 नवी मुंबई (पनवेल वैभव ) : मेडिकव्हर हॉस्पिटलमधील डॉ. पवन ओझा(रिजनल डायरेक्टर ऑफ न्युरोसायन्सेस) आणि डॉ. सुरंजन बसाक(न्युरोलॉजिस्ट) यांच्या टीमने ५४ वर्षीय महिलेमध्ये आढळलेल्या दुर्मीळ आणि गंभीर सेंट्रल नर्वस सिस्टम व्हॅस्क्युलायटिस अशा आरोग्य स्थितीवर उपचार करत तिला नवे आयुष्य मिळवून दिले. सेंट्रल नर्वस सिस्टम व्हॅस्क्युलायटिस एक दुर्मिळ स्थिती आहे जिथे मेंदू आणि पाठीच्या कण्यातील रक्तवाहिन्या सूजतात. ही जळजळ मेंदूतील रक्तप्रवाहात व्यत्यय आणू शकते, ज्यामुळे विविध न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवतात. 

रुग्णाला अचानक अशक्तपणा आणि बोबडी वळणे अशी लक्षणे जाणवत होती. सुरुवातीला हा प्रकार उच्च रक्तदाबामुळे झालेला नेहमीचा ब्रेन हॅमरेज वाटत होता; मात्र ४८ तासांनंतर तिची प्रकृती अचानक खालावल्याने डॉक्टरांना संशय आला. त्यानंतर करण्यात आलेल्या प्रगत तपासण्या, निरीक्षण आणि तातडीच्या उपचारांमुळे मेंदूचे होणारे नुकसान थांबवण्यात यश आले.

 'नवी मुंबईतील गृहिणी श्रीमती चैताली हलदर' यांना गेल्या १० वर्षांपासून उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या सुमारे एक तास आधी त्यांना अचानक शरीराच्या डाव्या बाजूला अशक्तपणा जाणवू लागला. त्यांचे बोलणे अस्पष्ट झाले होते तसेच आधाराशिवाय बसणे किंवा उभे राहणे शक्य होत नव्हते. मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर त्यांचा रक्तदाब धोकादायक पातळीवर म्हणजे २२०/११० मिमी एचजी इतका वाढला होता. न्युरोलॉजिकल तपासणीत डाव्या बाजूस अशक्तपणा , सुन्नपणा, समन्वय साधण्यात अडचणी, चेहऱ्याचा एक भाग लूळा पडणे आणि अस्पष्ट उच्चार अशी लक्षणे दिसून आली. मेंदूच्या सीटी स्कॅनमध्ये उजव्या भागात रक्तस्राव आणि सूज दिसून आली. तसेच मेंदूच्या दुसऱ्या भागात एक लक्षणं न दिसलेला छोटा स्ट्रोक आढळून आला. सीटी अँजिओग्राफीमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये कोणतीही असामान्यता दिसून आली नाही.

रुग्णाला तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करून रक्तदाब नियंत्रण, मेंदूतील सूज कमी करण्यासाठी औषधोपचार आणि झटके टाळण्यासाठी उपचार सुरू करण्यात आले. सुरुवातीच्या २४ तासांत प्रकृती स्थिरावल्याचे दिसून आले आणि कमीत कमी रक्तस्राव  झाला होता. त्यामुळे डॉक्टर आणि कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र सुमारे ५६ तासांनंतर अचानक डाव्या हातामध्ये अशक्तपणा दिसून आला आणि रुग्णाचे भान हरपले ,ती बोलण्यास प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे पुन्हा रक्तस्राव झाला असावा अशी भीती डॉक्टरांना वाटली. पुन्हा करण्यात आलेल्या मेंदूच्या तपासणीत रक्तस्राव वाढलेला नसतानाही मेंदूमध्ये नव्या इन्फार्क्शनची चिन्हे दिसून आली. तसेच अनेक सूक्ष्म रक्तस्रावही आढळले. हा प्रकार सामान्य उच्च रक्तदाबामुळे होणाऱ्या ब्रेन हॅमरेजसारखा नसल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी व्हॅस्क्युलायटिस तपासण्या आणि डीएसए (ब्रेन अँजिओग्राफी) यांसह पुढील तपासण्या सुरू केल्या.

 डॉ. पवन ओझा (रिजनल डायरेक्टर ऑफ न्युरोसायन्सेस, मेडिकव्हर हॉस्पिटल, खारघर, नवी मुंबई)म्हणाले, सुरुवातीला हा उच्च रक्तदाबामुळे झालेला नेहमीचा मेंदूतील रक्तस्राव वाटत होता. मात्र रक्तस्रावाचे ठिकाण आणि अचानक प्रकृती खालावणे हे सामान्य नव्हते. त्यामुळे आम्ही अधिक सखोल तपासणी केली. एमआरआयमध्ये अनेक सूक्ष्म इन्फार्क्ट्स आणि विखुरलेले मायक्रोब्लीड्स दिसून आले. रक्तस्राव आणि इन्फार्क्ट्स एकत्र दिसणे हे मेंदूतील लहान रक्तवाहिन्यांवर परिणाम करणाऱ्या लहान  सेंट्रल नर्वस सिस्टम व्हॅस्क्युलायटिस  या दाहजन्य आजाराचा संकेत होता. सीएनएस व्हॅस्क्युलायटिस हा दुर्मीळ न्युरोलॉजिकल आजार असून त्यात मेंदूमध्ये असामान्य रक्तस्राव किंवा स्ट्रोक, क्रॅनियल न्युरोपॅथी आणि मेंदुला झटके येणे अशी लक्षणे दिसून येतात. दर दहा लाख लोकसंख्येमागे सुमारे २.४ रुग्णांमध्ये हा आजार आढळतो. योग्य वेळी निदान झाल्यास हा आजार उपचारक्षम आहे. महत्त्वाचे म्हणजे नियमित अँजिओग्राफी तपासण्यांमध्ये हा आजार अनेकदा दिसून येत नाही, कारण प्रभावित रक्तवाहिन्या अतिशय सूक्ष्म असतात. पुढील तपासण्यांमध्ये दाह वाढल्याची चिन्हे आणि ऑटोइम्यून स्थिती आढळल्याने निदान निश्चित झाले. त्यानंतर आम्ही तातडीने उच्च मात्रेतील इंट्राव्हेनस स्टेरॉइड्स आणि इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी सुरू केली.

 डॉ. सुरंजन बसाक (न्युरोलॅाजिस्ट, मेडिकव्हर हॉस्पिटल, खारघर, नवी मुंबई) म्हणाल्या, हे अत्यंत आव्हानात्मक प्रकरण होते कारण सीटी अँजिओग्राफी आणि डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी (DSA) या नियमित तपासण्या सामान्य होत्या. स्मॉल व्हेसल व्हॅस्क्युलायटिसमध्ये प्रभावित रक्तवाहिन्या इतक्या सूक्ष्म असतात की त्या या तपासण्यांमध्ये दिसत नाहीत. रुग्णाची अचानक बिघडलेली प्रकृती ही मोठी धोक्याची घंटा होती. अशा वेळी आजाराची पूर्ण खात्री होईपर्यंत वाट पाहिल्यास उपचारास विलंब होऊ शकतो. त्यामुळे रोगाची प्रगती थांबवण्यासाठी आणि रुग्णाला लवर बरे वाटावे यासाठी वेळेवर इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी सुरू करणे गरजेचे आहे.

 डॉ. पवन ओझा पुढे म्हणाले, इंट्राव्हेनस स्टेरॉइड्स आणि इम्युनोसप्रेसंट उपचारानंतर रुग्णाची प्रकृती वेगाने स्थिर झाली आणि त्यात सुधारणा दिसून आली. सध्या त्या देखभाल उपचारांवर आहेत आणि नियमित फॉलोअप घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे. हे प्रकरण एक महत्त्वाचा संदेश देतो की मेंदूतील रक्तस्राव असामान्य असेल तर त्यामागील मूळ कारणाचा शोध घेणे आवश्यक असते. रक्तस्रावाचे असामान्य ठिकाण, रक्तस्रावासोबत स्ट्रोकची चिन्हे आणि अचानक प्रकृती खालावणे ही सेंट्रल नर्वस सिस्टम व्हॅस्क्युलायटिस  आजाराची लक्षणे असू शकतात. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास रुग्णाला कायमस्वरूपी लकवा येऊन दैनंदिन कामांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागले असते. मात्र योग्य निदान आणि वेळीच उपचारांमुळे रुग्णाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. १० दिवसांत रुग्णाला घरी देण्यात आले आणि आठवड्याभरात रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. आता त्या कोणत्याही आधाराशिवाय चालू शकतात आणि स्वतःची सर्व कामे स्वतंत्रपणे करू शकतात. दुर्मीळ प्रकारच्या स्ट्रोकचे वेळीच निदान आणि उपचार घेतल्यास गंभीर अपंगत्व टाळता येते आणि रुग्णाच्या पुनर्वसनाची शक्यता वाढते.

 मेडिकव्हर हॉस्पिटल, नवी मुंबईचे सेंटर हेड संदीप जोशी म्हणाले, हे प्रकरण मेडिकव्हर हॉस्पिटलमधील तज्ज्ञांचा समन्वय, योग्य वेळी घेतलेले अचुक निर्णय आणि प्रगत निदान सुविधांचे महत्त्व अधोरेखित करतो. दुर्मीळ पण उपचारक्षम न्युरोलॉजिकल आजारांचे वेळेवर निदान आणि उपचार रुग्णाच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात.
Comments