जेएनपीएने बदलले पनवेल - उरणवासीयांचे जीवनमान...
जेएनपीएने बदलले पनवेल - उरणवासीयांचे जीवनमान

वाढवण बंदरामुळे होणार पालघर जिल्ह्याचा कायापालट 

ठाणे / प्रतिनिधी -  : जेएनपीए (JNPA - जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीज), न्हावा शेवा बंदरामुळे पनवेल, नवी मुंबई आणि उरण विभागाचा औद्योगिक व पायाभूत विकास झाला असून, या परिसराचे रूपांतर एका प्रमुख व्यापारी केंद्रात झाले आहे. या बंदरामुळे स्थानिक रोजगार, वाहतूक व्यवस्था आणि नागरीकरण यामध्ये मोठी वाढ झाली आहे. जेएनपीए आता पालघर जिल्ह्यातील वाढवण येथील महत्वाकांक्षी बंदर उभारणी प्रकल्प हाती घेत असल्यामुळे उरण - पनवेल प्रमाणेच पालघर जिल्ह्याचा देखील कायापालट होणार आहे.

उरण आणि पनवेल परिसरात वेअर हाउसेस, कंटेनर डेपो (CFS) आणि विविध उद्योगांचे जाळे निर्माण झाले आहे. याचाच परिपाक म्हणून लाखो अप्रत्यक्ष रोजगार आणि व्यवसाय संधी देखील निर्माण झाल्या. रस्ते, रेल्वे आणि दळणवळणाच्या साधनांमध्ये सुधारणा होऊन हा भाग मुंबई आणि इतर भागांशी जोडला गेला आहे. थेट बंदर आणि संबंधित उद्योगांमुळे स्थानिक लोकांच्या रोजगारात वाढ झाली आहे. बंदराच्या विकासामुळे या भागात नागरीकरण वाढले असून, निवासी संकुले आणि व्यापारी पेठा विकसित झाल्या आहेत. उरण भागातील मोरा व आजूबाजूच्या जेट्टींमुळे जलवाहतूक सुलभ झाली आहे. 

जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण बंदरामुळे कुशल व अकुशल कामगारांना हाताला काम मिळाले व त्याचा घसघशीत मोबदला देखील मिळत गेला. परिणाम स्वरूप येथील रहिवाशांचे जीवनमान सुधारले. पनवेल आणि उरण परिसरामध्ये या एका बंदराच्या येण्याने सुबत्ता आली. आर्थिक स्तर उंचावल्यामुळे या परिसरातील गुंतवणूक वाढली. शैक्षणिक स्तर वधारला, उत्तमोत्तम शैक्षणिक संस्था या विभागामध्ये स्थिरावल्या. 

कस्टम क्लिअरिंग एजंट, टेम्पो वाहतूक, कलमार क्रेन, हायड्रा वाहतूक, ट्रेलर व्यवसाय अशा अनेक व्यवसायाच्या संधी स्थानिक तरुणांना उपलब्ध झाल्या आहेत. साधारणपणे गेल्या ३७ वर्षांमध्ये जेएनपीएच्या बंदरामुळे पनवेल उरण वासियांचे जीवनमान संपूर्णतः पालटून गेले आहे. परंतु आता जेएनपीए त्यांच्या विस्तारित बंदराचे काम सुरू करत असल्याने अशाच प्रकारच्या विकासाची संधी पालघर जिल्ह्याला निर्माण झाली आहे. या बंदरामुळे अनेक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.
Comments