नेपाळ, महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्ली, येथील नामांकित मल्ल सहभागी होणार
विजेत्यांना १५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची पारितोषिके
पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे युवा नेते, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रीडाप्रेमींसाठी भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. १८ मे २०२६ रोजी सायंकाळी ०४ वाजता कामोठे मधील सेक्टर ०६ येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानावर “मा.श्री.परेशशेठ ठाकूर केसरी २०२६” या भव्य जंगी कुस्तींचे सामने होणार आहेत. त्या अनुषंगाने सोमवारी कामोठेत कुस्तीचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
या सामन्यांचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार असून यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, आमदार महेश लांडगे यांची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश बालदी, आमदार मंदाताई म्हात्रे, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखडे, शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, महापौर नितीन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, सभागृहनेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, भाजपचे कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली मंडल अध्यक्ष अमर पाटील, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, नविन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, उत्तर मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, पश्चिम मंडल अध्यक्ष रुपेश धुमाळ यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींची उपस्थिती असणार आहे.
पनवेलमधील नागरिकांना राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती सामने प्रत्यक्ष अनुभवता यावा, महाराष्ट्राची पारंपरिक कुस्ती संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचावी आणि नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन सातत्याने करण्यात येत आहे. दरवर्षी हजारो क्रीडाप्रेमी या स्पर्धेला उपस्थित राहून मातीतील थरार अनुभवतात. या स्पर्धेत नेपाळ, महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्ली, येथील नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी तसेच महिला कुस्तीपटूंचे विशेष सामने हे यंदाच्या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असणार आहे. या स्पर्धेतील एकूण विजेत्यांना १५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची पारितोषिके असणार आहेत.