महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग
पनवेल / प्रतिनिधी : -
पनवेल महानगरपालिका हद्दीत सामान्य कर्करोगांचे पूर्व-तपासणी, लवकर निदान, प्रतिबंध व जनजागृती कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई व पनवेल महानगरपालिका यांच्यात विशेष करार करण्यात आलेला आहे. या कराराअंतर्गत आरोग्य यंत्रणा बळकट करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व समुदाय स्तरावर कर्करोग तपासणी सेवा सक्षम करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई (प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी सर्व्हिसेस, खोपोली) व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने “सामान्य कर्करोगांचे प्रतिबंध, नियंत्रण व लवकर निदान” या विषयावर एएनएम व स्टाफ नर्सेससाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा दोन टप्प्यांत यशस्वीरीत्या पार पडली.
ही कार्यशाळा दिनांक २५ व २७ मार्च तसेच १६ व १७ एप्रिल २०२६ रोजी सिडको समाज केंद्र, कामोठे येथे आयोजित करण्यात आली होती. एकूण १२० नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांनी यात सक्रिय सहभाग घेतला.
कार्यशाळेमध्ये स्तन, गर्भाशय मुख (सर्व्हिकल) व तोंडाचा (ओरल) कर्करोग यांचे प्रमाण, जोखमीचे घटक, लक्षणे, तपासणी पद्धती व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच एचपीव्ही डीएनए चाचणी, पॅप स्मीअर, VIA तपासणी यांचे प्रात्यक्षिक सत्र घेण्यात आले. स्तन स्वयं-परीक्षण, तोंडाच्या कर्करोग तपासणी, तंबाखू निर्मूलन समुपदेशन व जनजागृती यावरही भर देण्यात आला.
कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता प्रितम म्हात्रे यांनी महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्यासह कार्यशाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी आशा सेविका व नर्सेस यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व प्रशिक्षणाचा आढावा घेतला.
कोट
“महिलांचे आरोग्य हे समाजाच्या सुदृढ भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून आम्ही प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, लवकर निदान आणि जनजागृती यावर आधारित उपक्रम प्रभावीपणे राबवत आहोत. प्रत्येक महिलेला वेळेवर तपासणी व योग्य मार्गदर्शन मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे.”
ममता प्रितम म्हात्रे
महिला-बालकल्याण समिती
पनवेल महानगरपालिका
त्यांनी पुढे नमूद केले की, केंद्र व राज्य सरकार महिला आरोग्य, सक्षमीकरण व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांवर विशेष भर देत असून त्याच धोरणाच्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिका प्रभावीपणे कार्य करत आहे.
यापूर्वी आशा कार्यकर्त्यांचेही प्रशिक्षण घेण्यात आले असून आता प्रशिक्षित नर्सेस व आशा सेविकांच्या संयुक्त प्रयत्नातून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (UPHC) स्तरावर कर्करोग तपासणी शिबिरे अधिक प्रभावीपणे आयोजित करण्यात येणार आहेत.
पनवेल महानगरपालिका सर्व नागरिकांना आवाहन करते की, या तपासणी शिबिरांमध्ये सहभागी होऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
कार्यशाळेतील सहभागी नर्सेसनी या प्रशिक्षणामुळे कर्करोगाच्या लवकर निदानाचे महत्त्व अधिक स्पष्ट झाल्याचे सांगितले व समुदायामध्ये जनजागृतीसाठी सक्रिय भूमिका निभावण्याचा निर्धार व्यक्त केला.
पनवेल महानगरपालिका भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी कटिबद्ध राहील.