रामशेठ ठाकूर मैदानावर संघभावना आणि दमदार कबड्डीचा उत्सव ...

रामशेठ ठाकूर मैदानावर संघभावना आणि दमदार कबड्डीचा उत्सव  


पनवेल (हरेश साठे) संघभावना, चपळाई आणि अचूक रणनीती यांचा रोमांचक संगम उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डी स्पर्धेतून अनुभवायला मिळाला. निमित्त होते ते गोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्त्व आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला व पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी २०२६’ स्पर्धेचे. 

या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील ३२ महिला व १२८ पुरुष संघांनी सहभाग नोंदवला. दिनांक २० ते २२ फेब्रुवारी अशा तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. प्रत्येक सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळत होती.  संघभावना, बचावातील चपळाई आणि आक्रमणातील अचूकता यांचा थरार अनुभवत होता. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट खेळाडूंची निवड करून त्यांना पुढील राज्यस्तरीय स्पर्धांसाठी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्हास्तरावर दर्जेदार खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने ही निवड चाचणी महत्त्वपूर्ण अशी होती.  लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी जनरल सेक्रेटरी ॲड. आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनने केलेले उत्तम नियोजन, पंचांची काटेकोर कामगिरी आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मोठे यश लाभले आहे. 

कबड्डी हा ग्रामीण मातीतून उगम पावलेला खेळ असला तरी आज तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. अशा पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धांना विशेष महत्त्व प्राप्त होते. या स्पर्धेच्या माध्यमातून गुणवंत खेळाडूंना पुढील राज्यस्तरीय स्पर्धांसाठी संधी मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरला. पुरुष व महिला या दोन्ही गटातील सामने विशेष आकर्षण ठरले.  बचावातील अचूक पकड, चढाईतील वेग आणि संघातील समन्वय यामुळे सामने अधिक रोमांचक बनले.प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी दमदार चढाया आणि भक्कम बचावाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. चढाई करताना खेळाडूंची वेगवान हालचाल आणि बचावपटूंची एकजूट यामुळे प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट होत होता. अनेक सामन्यांमध्ये कडवी झुंज पहायला मिळाली. स्पर्धेच्या आयोजनात खेळाडूंसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामध्ये दर्जेदार क्रीडांगण, वैद्यकीय सुविधा, प्रेक्षक गॅलरी, भोजन, नाश्ता, अशा सर्व आवश्यक व्यवस्था या ठिकाणी आहेत. विशेष म्हणजे खेळाडू, व त्यांचे सहकारी, पंच, प्रेक्षक यांना रखरखत्या उन्हाळी झळ लागू नये म्हणून क्रीडांगणावर आकर्षक असे छत टाकण्यात आले. उलवे परिसरात या निमित्ताने क्रीडामय वातावरण निर्माण झाले . यावेळी कबड्डीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना उत्साहवर्धन करत होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक संस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Comments