एकाच शस्त्रक्रियेत तीन जीवघेण्या मेंदूच्या आजारांवर केली मात ; रुग्ण चालत घरी परतली...
एकाच शस्त्रक्रियेत तीन जीवघेण्या मेंदूच्या आजारांवर केली मात ; रुग्ण चालत घरी परतली... 

 न्युईरा हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या प्रयनांना यश... 

 
नवी मुंबई / पनवेल वैभव  -  : प्रगत न्यूरोसर्जिकल उपचार आणि प्रसंगावधान राखत केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेचे उत्तम उदाहरण नवी मुंबईतील न्युईरा हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळाले. गुंतागुंतीच्या मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर ५४ वर्षीय महिलेने जीवघेण्या मेंदूच्या आजारांवर मात केली. यशस्वी उपचारानंतर रुग्ण चालत घरी परतली असून तिच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली.

सुरुवातीला तपासणीदरम्यान रुग्णामध्ये एक मोठा मेंदूचा ट्यूमर आढळून आला. मात्र पुढील तपासणीत त्याचबरोबर सबड्युरल हेमॅटोमा (मेंदूतील रक्तस्राव) तसेच मेंदूच्या विरुद्ध बाजूला आणखी एक ट्यूमर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीचे ठरले.

रुग्णावर दोन अत्यंत गुंतागुंतीच्या मेंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मोठा सबड्युरल हेमॅटोमा तसेच दोन मोठे मेंदूचे ट्यूमर एकाच वेळी यशस्वीरित्या काढण्यात आले.ही दुर्मिळ *शस्त्रक्रिया डॉ. सुनील कुट्टी (न्यूरोसर्जन, न्युईरा हॉस्पिटल) आणि त्यांच्या टीमने यशस्वीपणे पार पाडली.* ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीच्या न्यूरोलॉजिकल स्थितीच्या व्यवस्थापनात एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.
रुग्णालयात दाखल होताना रुग्णाला उभे राहणेही कठीण झाले होते, मात्र आता ती कोणत्याही आधाराशिवाय चालू लागली आहे.

 *नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राहणाऱ्या ५४ वर्षीय रुग्ण सौ. सुमन पोखरे* यांना गेल्या १५ दिवसांपासून चालताना अशक्तपणा, तोल जाणे आणि दैनंदिन कामे करताना अडचणी येत होत्या.ब्रेन इमेजिंगमध्ये मेंदूच्या एका बाजूला मोठा सब-अ‍ॅक्युट सबड्युरल हेमॅटोमा (मेंदूतील रक्तस्राव) आढळून आला, ज्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. त्याचवेळी मेंदूच्या दुसऱ्या बाजूला जवळजवळ गोल्फ बॉलच्या आकाराचा एक मोठा मेंदूचा ट्यूमर देखील आढळून आला, जो शस्त्रक्रियेने काढणे गरजेचे होते.

रुग्णाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्यामुळे प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. आपत्कालीन विभागात प्राथमिक उपचार सुरू करून तिला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. रुग्णाला इंट्राव्हेनस अँटीबायोटिक्स तसेच अँटीपिलेप्टिक औषधे देण्यात आली. स्थितीची गंभीरता आणि मेंदूवरील दाब लक्षात घेऊन दुसऱ्याच दिवशी सकाळी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 *डॉ. सुनील कुट्टी (न्यूरोसर्जन) यांनी सांगितले की,* 
१२ नोव्हेंबर २०२५ रोजी रुग्णावर क्रॅनियोटॉमी ही अत्यंत नाजूक मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेत मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी कवटीचा एक छोटा भाग उघडून रक्तस्राव किंवा ट्यूमरसारख्या जीवघेण्या स्थितींवर उपचार केले जातात आणि नंतर कवटी सुरक्षितपणे बंद केली जाते.

क्लॉट काढताना आम्हाला मेंदूच्या संरक्षक आवरणात घुसलेला आणखी एक ट्यूमर आढळला, जो मेंदूवर दाब आणत होता. त्यामुळे हे प्रकरण अधिकच दुर्मिळ झाले. सामान्यतः एका वेळी मेंदूच्या एका विकारावर उपचार केले जातात. मात्र या रुग्णामध्ये एकाच वेळी तीन गंभीर समस्या आढळून आल्या मेंदूच्या विरुद्ध बाजूंना दोन मोठे ट्यूमर आणि एक मोठा सबड्युरल हेमॅटोमा आढळून येतो.

या प्रत्येक स्थितीत मेंदूला सूज, कायमस्वरूपी नुकसान, पक्षाघात, अर्धांगवायू किंवा मृत्यूचा धोका असतो आणि त्यासाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया आवश्यक असते. मात्र या प्रकरणात तिन्ही शस्त्रक्रिया एकत्रितपणे करत अचूक व्यवस्थापन करण्यात आले.

 *डॉ. कुट्टी पुढे म्हणाले,* दोन मेंदूचे ट्यूमर आणि सबड्युरल हेमॅटोमा एकाच वेळी हाताळणे अत्यंत दुर्मिळ आहे. १ लाख लोकांपैकी सुमारे ४ जणांमध्ये ब्रेन ट्यूमर आढळतो आणि यापैकी १ टक्क्यांपेक्षा कमी प्रकरणांमध्ये दुहेरी ब्रेन ट्यूमर दिसून येतो. त्यातही सबड्युरल हेमॅटोमा ही आणखी एक दुर्मिळ स्थिती आहे.

रुग्णावर दोन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सुमारे ४.५ सेमी आणि २ सेमी व्यासाचे दोन ब्रेन ट्यूमर तसेच मेंदूतील रक्तस्रावामुळे तयार झालेल्या रक्ताच्या गुठळ्या यशस्वीरित्या काढून टाकण्यात आल्या. या शस्त्रक्रिया सुमारे ५ तास चालल्या आणि त्या एकाच ऑपरेशनमध्ये पार पाडण्यात आल्या. तीनही गंभीर समस्या एकाच वेळी हाताळल्यामुळे पुन्हा-पुन्हा धोकादायक शस्त्रक्रिया टाळता आल्या, गुंतागुंतीचा धोका कमी झाला आणि रुग्णाच्या बरे होण्याचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी झाला.

शस्त्रक्रियेनंतर सतत वैद्यकीय देखरेखीखाली आणि फिजिओथेरपीच्या मदतीने रुग्णाची प्रकृती हळूहळू सुधारत गेली. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी रुग्णाला आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर तिची प्रकृती स्थिर राहिली. शस्त्रक्रियेच्या ठिकाणी वेदना नव्हत्या, मेंदूशी संबंधित कोणतीही समस्या दिसून आली नाही आणि ती हात-पाय स्वतंत्रपणे हलवू शकत होती. डिसेंबरमध्ये केलेल्या फॅालोअप तपासणी दरम्यान, रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत होती आणि मेंदूसंबंधी कोणतीही नवीन समस्या आढळून आली नाही.

शस्त्रक्रियेनंतरच्या तपासण्यांमध्ये ट्यूमर पूर्णपणे काढण्यात आल्याचे आणि मेंदूतील रक्तस्रावामुळे झालेल्या गुठळ्या पूर्णपणे निघाल्याचे स्पष्ट झाले. रुग्णाचा आत्मविश्वास हळूहळू वाढत गेला आणि शस्त्रक्रियेनंतर तिसऱ्या दिवशी तिला घरी सोडण्यात आले.

अशा प्रकारचे यशस्वी परिणाम वेळेवर उपचार, अचूक निदान, आधुनिक तपासण्या आणि तज्ज्ञांचा समन्वय यामुळेच शक्य होतात, *अशी प्रतिक्रिया डॉ. सुनील कुट्टी यांनी व्यक्त केली.* 

 *याबाबत बोलताना रुग्ण सौ. सुमन पोखरे म्हणाल्या,* 
“माझ्या मेंदूत रक्तस्राव असून त्यासोबत दोन ट्यूमर असल्याचे कळल्यावर मी खूप घाबरले होते. मला नीट चालताही येत नव्हते आणि परिस्थिती आणखी गंभीर होईल, अशी भीती वाटत होती. डॉ. सुनील कुट्टी आणि त्यांच्या टीमने मला शांतपणे सर्व समजावून सांगितले आणि शस्त्रक्रियेला सामोरे जाण्याचे धैर्य दिले. ऑपरेशननंतर प्रत्येक दिवस माझ्यासाठी नवीन आशा घेऊन आला. आज मी स्वतंत्रपणे चालू शकते, दैनंदिन कामांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत नाही. मला आयुष्यात दुसरी संधी मिळाल्यासारखे वाटते.”

*डॉ. माताप्रसाद बी गुप्ता(उपाध्यक्ष आणि सीईओ - न्यूईरा हॉस्पिटल)  सांगतात की*, न्यूईरा हॉस्पिटल हे अत्याधुनिक सुविधा, प्रगत इमेजिंग तंत्रज्ञान आणि कुशल तज्ज्ञाच्या सहकार्याने गुंतागुंतीच्या न्यूरोलॉजिकल समस्या हाताळण्यासाठी सुसज्ज आहे. प्रसंगावधान राखत त्वरित व अचुक उपचार करत रुग्णांना बरे होण्यास मदत करण्यासाठी  हॉस्पिटलची टिम नेहमीच प्रयत्नशील असते.


चौकट
१ लाख लोकांपैकी सुमारे ४ जणांमध्ये मेंदूचा ट्यूमर आढळतो. यापैकी १ टक्क्यांपेक्षा कमी रुग्णांमध्ये दुहेरी मेंदूचे ट्यूमर आढळतात. त्यातही सबड्युरल हेमॅटोमा (मेंदूतील रक्तस्राव) ही स्थिती अत्यंत दुर्मिळ मानली जाते.

या प्रत्येक स्थितीत मेंदूला सूज येणे, मेंदूचे कायमस्वरूपी नुकसान, पक्षाघाताचे झटके, अर्धांगवायू किंवा मृत्यूचा धोका संभवतो आणि त्यासाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया आवश्यक असते. मात्र या प्रकरणात तिन्ही आजारांचे अचूक नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात आले.

Comments