पनवेल-करंजाडे पुलासह रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन...

पनवेल-करंजाडे पुलासह रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नांमुळेच पनवेल परिसराचा विकास वेगाने होत असून विकासाची गंगा करंजाडे येथे आल्याचे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले.
पनवेल महापालिकेच्या वतीने पनवेल आणि करंजाडेदरम्यान गाढी नदीवर बांधण्यात येणार्‍या 50 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी नवीन पुलाचे तसेच सिडकोच्या माध्यमातून 14 कोटी रुपयांच्या निधीतून करंजाडे सेक्टर 1 ते 6मधील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या महत्त्वाच्या कामांच्या शुभारंभामुळे वाहतुकीमध्ये सुलभता येणार असून परिसराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी, पनवेल महापालिकेच्या माध्यमातून करंजाडेच्या विकासाच्या दृष्टीने नवा अध्याय लिहिला जात असल्याचे सांगून करंजाडे आणि उलवे नोड पनवेल महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. मंत्रालयीन स्तरावर कागदपत्रांची पूर्तता पूर्ण होत आली असून लवकरच करंजाडे नोड पनवेल महापालिकेला जोडला जाईल. सध्या पुलाच्या माध्यमातून जोडणी सुरू होत असून हा महत्त्वाचा पूल लवकर पूर्ण व्हावा यासाठी आपण सर्वजण पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले.
आपल्या भाषणात आमदार महेश बालदी यांनी, लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे करंजाडे परिसराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असल्याचे नमूद केले. परिसरात अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असून हा पूल पुढील 18 महिन्यांमध्ये करंजाडेवासीयांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त करून जनतेची सेवा करण्यासाठी भाजप तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी जि.प. सदस्य जीवन म्हात्रे, माजी पं.स. सदस्य निलेश पाटील, जगदीश पवार, करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, पनवेल दक्षिण मंडल अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल पश्चिम मंडल अध्यक्ष रूपेश धुमाळ, करंजाडे विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, मयुरेश नेतकर, ज्येष्ठ नेते सुभाष म्हात्रे, प्रकाश जितेकर, माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, शहर अध्यक्ष संदेश पाटील, वडघर जि.प. विभागीय अध्यक्ष गजानन पाटील, पं.स. अध्यक्ष समीर केणी, गुळसुंदे जि.प. विभागीय अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशिव वास्कर, प्रकाश पाटील, मनखुश नाईक, महेंद्र गोजे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
Comments