श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहादत वर्षानिमित्त ७ डिसेंबर रोजी मॅरेथॉन रन चे आयोजन...
पनवेल वैभव / प्रतिनिधी : -
शिखांच्या नवव्या धर्मगुरू श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहादत वर्षानिमित्त गुरुद्वारा श्री दशमेश दरबार कोपरखैरणे यांच्या वतीने, सुप्रीम कौन्सिल ऑफ नवी मुंबई गुरुद्वारा, नवी मुंबई महानगरपालिका आणि लेट्स सेलिब्रेट फिटनेस या एनजीओच्या विशेष सहकार्याने, ७ डिसेंबर रोजी मॅरेथॉन रनचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती वाशी येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या पत्रकार परिषदेला गुरुद्वारा श्री दशमेश दरबार कोपरखैरणेचे अध्यक्ष इंद्रप्रीत सिंह भाटिया, लेट्स सेलिब्रेट फिटनेस एनजीओच्या रिचा, रामेश्वर नाईक, तेजिंदर सिंह, हॅप्पी सिंह आणि नवी मुंबईतील विविध गुरुद्वाऱ्यांचे प्रमुख उपस्थित होते.
मानवतेचे रक्षण आणि आरोग्याच्या संवर्धनाचे दोन प्रमुख उद्देश ठेवून ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. ही मॅरेथॉन ७ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता नवी मुंबई मनपा मुख्यालयातून सुरू होणार आहे. या मॅरेथॉनमध्ये ५ किलोमीटर, १० किलोमीटर, २१ किलोमीटर आणि ३२ किलोमीटर अशा चार वेगवेगळ्या श्रेणी असतील.
यादरम्यान आयोजकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या मॅरेथॉनचा मुख्य हेतू म्हणजे गुरु तेग बहादुर साहिबजी यांची अमरगाथा, त्याग, धर्मरक्षण आणि मानवतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवणे हा आहे. त्यांनी सर्वांना आवाहन केले की, अधिकाधिक संख्येने या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे.