सिडकोने प्रकल्पग्रस्त गावांच्या शेकडो एकर गुरचरण जमिनी फुकटात लाटल्या - महेंद्रशेठ घरत
गावोगावच्या मैदानांचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे महेंद्रशेठ घरत यांचे मत
उलवे, ता. १७ : "सिडकोच्या उरावर बसून मी शेलघर या माझ्या गावासाठी मैदान मिळवून दाखविले. वर्षानुवर्षे आम्ही गुण्यागोविंदाने गावच्या मैदानात क्रिकेट खेळत होतो, हे सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यावेळी पटवून दिले होते. त्यामुळेच परिसरात सुसज्ज मैदान म्हणून शेलघरच्या मैदानाची आज ख्याती आहे. गव्हाण, कोपर, मोरावे तसेच परिसरातील अनेक गावांना मी स्वतः आमदार, खासदार नसतानाही मैदाने मिळवून दिली आहेत. आज उलवे नोड विकसित होत आहे, पण परिसरातील भूमिपुत्रांच्या अनेक गावांना पुरेसे पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे. अनेक गावांच्या शेकडो एकर गुरचरण जमिनी सिडकोने फुकटात लाटल्या. त्यामुळे उरण, पनवेलचे आमदार नेमके करतात काय? त्यांना गावोगावच्या मैदानांचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर वाटत नाही का?" असा सवाल आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी उलवे नोड प्रीमियर लिग २०२६ च्या लिलावप्रसंगी शेलघर येथील दिवंगत जोमा नारायण घरत समाजमंदिरात विचारला. तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटात महेंद्रशेठ घरत यांनी सत्य परिस्थिती मांडल्यानंतर उपस्थित तरुणांनी साथ दिली.
"नवी मुंबई विमानतळ बाधितांचे पुनर्वसन व्यवस्थित झाले नाही. तेथील रस्ते हे गल्लीबोलासारखे आहेत. प्रकल्पग्रस्त गावांतील तरुण पूर्वी गावाशेजारील मोकळ्या मैदानांत विनासायास विविध खेळांचा आनंद घेत होते; परंतु विमानतळबाधित स्थलांतरित गावांना सिडकोने मैदानेच दिली नाहीत, ही शोकांतिका आहे, सिडकोने केलेली गंभीर चूक आहे," असेही यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले.
रविवारी (ता. १६) महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते उलवे प्रीमियर लिग २०२६ ची लिलाव प्रक्रियेचे उदघाटन झाले. त्यावेळी गव्हाणचे उपसरपंच सचिन घरत, सुधीर ठाकूर आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.