‘खेलो इंडिया’ अंतर्गत रायगड जिल्हा अस्मिता ॲथलेटिक्स लीग कळंबोली येथे
१७ नोव्हेंबरला अर्जुन पुरस्कार विजेत्या ललिता बाबर यांच्या उपस्थितीत उद्घाटन
पनवेल, ता. 10 (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या ‘खेलो इंडिया’ या उपक्रमाअंतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘'अस्मिता ॲथलेटिक्स लीग स्पर्धा’' आयोजित करण्यात आली आहे. या लीगचे उद्दिष्ट महिलांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढवणे, ॲथलेटिक्सला प्रोत्साहन देणे आणि जिल्हास्तरावर तळागाळातील क्रीडा नैपुण्य विकसित करणे हे आहे.
या उपक्रमासाठी संपूर्ण देशातील ३०० जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये रायगड जिल्ह्याचाही समावेश आहे. रायगड जिल्ह्यासाठी ही स्पर्धा सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी मुंबई पोलीस मुख्यालय, कळंबोली येथे पार पडणार आहे.
सदर स्पर्धेच्या उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून ऑलिंपिक खेळाडू व अर्जुन पुरस्कार विजेत्या ललिता बाबर या उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धा १४ वर्षाखालील मुली आणि १६ वर्षाखालील मुली या दोन गटांसाठी घेण्यात येणार असून, रायगड जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक संस्थांमधील सुमारे ५०० ते ६०० खेळाडू सहभाग घेतील अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.
स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंना प्रमाणपत्र आणि पदकांनी गौरविण्यात येईल. तसेच AFI द्वारे नियुक्त निवड पथक या स्पर्धेदरम्यान प्रतिभावान आणि भविष्यकाळात उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंची निवड करणार आहे.
या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी या स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
चौकट
स्पर्धेसाठी प्रवेशिका १४ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत https://forms.gle/m6gZ3edLoksxz1VF7 या लिंकवर भरता येतील. अधिक माहितीसाठी प्रविण खुटारकर (९७७३५२५७७७) किंवा यतीराज पाटील (९९२११७१७००) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहिती raigadathletics.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कोट :
अस्मिता ॲथलेटिक्स लीग ही रायगड जिल्ह्यातील मुलींना त्यांच्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी आणि पुढील स्तरावर झेप घेण्यासाठी एक उत्कृष्ट संधी आहे. या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंना समान व्यासपीठ मिळणार आहे.
आमचा उद्देश अधिकाधिक मुलींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, अॅथलेटिक्सला आपला करिअर पर्याय म्हणून स्वीकारावे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, हा आहे.
बाळाराम पाटील
अध्यक्ष,
रायगड जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन