खारघर मधील अधिराज टॉवरच्या ५१ व्या मजल्यावर लागली भीषण आग....
पनवेल दि.०६(वार्ताहर): खारघर, सेक्टर ३६ येथील ५५ मजली 'अधिराज कॅपिटल सिटी' टॉवरमध्ये रात्री ५१ व्या मजल्यावरील एका बंद अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागण्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, कारण इमारतीतील रहिवाशांनी तात्काळ आपत्कालीन मार्गाचा वापर करून सुरक्षित स्थळी स्थलांतर केले होते. मात्र, पनवेल परिसरात वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे परिसरातील आगीचे हे सत्र सुरूच असल्याचे चित्र यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.
रात्री ११.२४ वाजता खारघर अग्निशमन दलाला अधिराज टॉवरमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान अग्निशमन बंब आणि पाण्याचे टँकर घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता जास्त असल्याने काळंबोली अग्निशमन दलाच्या पथकालाही तातडीने मदतीसाठी पाचारण करण्यात आले. पनवेलचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, "बंद असलेल्या ५१ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शॉर्ट-सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे." टॉवरची उंची जास्त असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले. अग्निशमन दलाच्या एका पथकाने पायऱ्या चढून थेट ५१व्या मजल्यावर प्रवेश केला, तर दुसऱ्या पथकाने लिफ्टचा वापर ४८ व्या मजल्यापर्यंत करून, त्यानंतर पायऱ्या चढून ५१व्या मजल्यावर आग विझवण्याची मोहीम सुरू केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे तीन तास केलेल्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, या दुर्घटनेत ५१ व्या मजल्यावरील फ्लॅट पूर्णपणे जळून खाक झाला.
फोटो: आग