वडाळे तलाव परिसरातील रोड रोमियोंना चपराक...
वडाळे तलाव परिसरातील रोड रोमियोंना चपराक

भाजपच्या उमेश इनामदार यांच्या प्रयत्नातून पोलिस प्रशासनाची कार्यवाही

पनवेल/प्रतिनिधी:- 
 पनवेलमधील वडाळे तलाव परिसरात वेगाने गाडी चालवणे,मोठ्या आवाजात हाॅर्न वाजवणे,दुचाकींचे स्टंट करणारे अशा रोड रोमियोंना भाजपच्या उमेश इनामदार यांच्या प्रयत्नातून पोलिस प्रशासनाकडून चांगलीच चपराक बसवली आहे. या रोड रोमियोंकडून दंड वसूल करत काहींना कान पकडून माफी मागायला लावली.
शहरातील वडाळे तलाव परिसरात पनवेल आणि आसपासचे नागरिक विरंगुळा म्हणून तसेच माॅर्निंग वाॅक साठी फिरायला येत असतात.याच ठिकाणी शाळा आणि महाविद्यालय देखील आहे.या भागात रोड रोमियोंचा वावर वाढला होता. वेगाने गाडी चालवणे, जोराने हाॅर्न वाजवणे, स्टंट करणे आणि मुलींची छेडछाड असे प्रकार वाढले होते. यामध्ये अल्पवयीन युवकांची संख्या जास्त होती. याबाबतची तक्रार अनेकदा ज्येष्ठ नागरिक तसेच महिला वर्ग करत होते. यामुळे भाजपचे उमेश इनामदार यांनी या बाबीकडे लक्ष टाकत पोलिस प्रशासनाला याबाबत कार्यवाही करण्याची विनंती केली. 
पोलिस प्रशासनाचे वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील आणि शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शाकीर पटेल यांच्यासहीत उमेश इनामदार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तेव्हा काही युवक वेगात गाडी चालवताना, गाड्यांचे स्टंट करताना तसेच हाॅर्न जोरात वाजवताना आणि दुचाकीवर ट्रिपल सीट आढळून आले.पोलिस प्रशासनाने लागलीच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली तर काहींना कान पकडून माफी मागायला लावली. या कार्यवाहीमुळे अशा रोड रोमियोंना आळा बसणार असून ही कारवाई म्हणजे चपराक असल्याचे बोलले जात आहे. 
यावेळी उमेश इनामदार यांच्या सोबत भाजपचे शहर उपाध्यक्ष केदार भगत आणि सचिन नाझरे हे देखील उपस्थित होते.
Comments