भाजपवासी झालेले माजी नगरसेवक हरेश केणी यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश...
पनवेल / प्रतिनिधी - :
पनवेलच्या राजकीय वर्तुळात मोठ्या हालचालींना वेग येत असून, भाजपवासी झालेले माजी नगरसेवक हरेश केणी, रविकांत म्हात्रे आणि भाजप पदाधिकारी कैलाश घरत यांनी शुक्रवार दि. १९ सप्टेंबर मुंबईतील टिळक भवन, दादर येथे काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
या सोहळ्याला काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते, ज्यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव माणिकराव ठाकरे, महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, महाराष्ट्र काँग्रेसच्या सचिव श्रुती म्हात्रे, जिल्हा काँग्रेसच्या कार्याध्यक्ष शशिकला सिंह, अल्पसंख्यक विभागाचे अध्यक्ष नौफिल सय्यद, युवक जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, सेवादल जिल्हाध्यक्ष शैलेश पाटणे आणि अम्मार सय्याद यांचा समावेश होता. या नेत्यांनी नव्याने सामील झालेल्या नेत्यांचे स्वागत करत त्यांच्या अनुभवाला पक्षासाठी मोलाचे ठरवले.
हरेश केणी हे पनवेलच्या राजकारणातील एक प्रभावी नाव आहे. पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती असलेले केणी यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) तिकिटावर पनवेलमधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांना टक्कर दिली होती. मात्र, शेकापच्या नेत्यांनी दिलेला शब्द न पाळल्याचा आरोप करत केणी यांनी पक्ष सोडला आणि २०२० मध्ये पाच नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे शेकापला मोठा धक्का बसला होता.
मात्र, काही काळापूर्वी वैचारिक मतभेद आणि वैयक्तिक कारणांमुळे केणी यांनी पनवेल तालुका उत्तर मंडळ अध्यक्षपदाचा आणि भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या राजीनाम्याने भाजपला धक्का बसला असताना केणी कोणत्या पक्षात प्रवेश करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज त्यांनी रविकांत म्हात्रे आणि कैलाश घरत यांच्यासह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग येत असताना हा पक्षप्रवेश काँग्रेससाठी मोठा टप्पा मानला जात आहे. हरेश केणी यांचा ग्रामीण भागात मजबूत जनसंपर्क आहे, तर रविकांत म्हात्रे यांच्या पत्नी जयश्री रविकांत म्हात्रे या स्थानिक पातळीवर सक्रिय नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. कैलाश घरत यांचा पक्षसंघटनेतील अनुभव काँग्रेसला शहरी आणि ग्रामीण मतदारांपर्यंत पोहोचण्यास मदत करू शकतो. या तिघांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला पनवेलमध्ये नव्याने बळ मिळण्याची शक्यता आहे. तसेच ऑक्टोबर महिन्यात पनवेल मध्ये भाजपाच्या आणखी नगरसेवक व पदाधिकारी यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी पनवेलमधील काँग्रेसच्या वाढत्या प्रभावावर भाष्य करत नव्या नेत्यांचे स्वागत केले.