गव्हाण गावाच्या पाणीपुरवठा समस्येवर जनआक्रोश मोर्चा ...
प्रितम म्हात्रे यांची पोलीस आणि सिडको अधिकाऱ्यांशी यशस्वी मध्यस्ती"
[सिडकोकडून तात्काळ पाणीपुरवठ्याचे आश्वासन]


पनवेल / प्रतिनिधी : -          
गव्हाण गावाला नियमित व मुबलक पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी आज गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश मिळाले असून, सिडको प्रशासनाने आजपासून गावाला आवश्यक पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे.

मोर्चादरम्यान, गव्हाण गावासाठी हेटवणे पाणीपुरवठ्यातून स्वतंत्र नवीन पाईपलाईन टाकण्याची मागणीही करण्यात आली. या संदर्भात येत्या ५ ते ६ दिवसांत सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सर्वपक्षीय बैठकीचे नियोजन करण्यात येणार आहे.

समस्या आणि पार्श्वभूमी

नवी मुंबई आणि उलवे नोडच्या जलद विकासाच्या प्रक्रियेत गव्हाण गाव हा त्याचा एक भाग असूनही विविध मूलभूत समस्यांना सामोरे जात आहे. त्यापैकी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. गावाला दररोज सुमारे 6 लाख लिटर पाण्याची गरज असताना, पाणी कमी दाबाने आणि अपुर्‍या प्रमाणात सोडले जात होते.

मोर्चाची सुरुवात आणि प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

मोर्चाची सुरुवात गव्हाण ग्रामपंचायत कार्यालय येथून झाली. या वेळी ग्रामस्थांनी सिडको प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.मोर्चाला भाजप नेते प्रितम जनार्दन म्हात्रे, माजी सरपंच भाऊशेठ पाटील, माजी उपसरपंच विजय घरत, कोळी समाज नेते विश्वनाथ कोळी, हेमंत ठाकूर, वसंत म्हात्रे, जयवंत देशमुख, देशमुख समाज अध्यक्ष किरण देशमुख, आगरी समाज अध्यक्ष अशोक कडू, योगिता भगत, हेमंत पाटील, ऋषी कोळी, राजू कोळी यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील महिलांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती.

चर्चा व निकाल
मोर्चा मार्गस्थ होण्याआधी सिडकोचे सहाय्यक अभियंता आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी प्रितम म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन केलेल्या सखोल चर्चेनंतर, सिडको प्रशासनाने गव्हाण गावाला आवश्यक पाणीपुरवठा तात्काळ सुरू करण्याचे मान्य केले. तसेच, कायमस्वरूपी तोडगा म्हणून हेटवणे पाणीपुरवठ्यातून स्वतंत्र पाईपलाईन टाकण्याच्या मागणीवर येत्या काही दिवसांत उच्चस्तरीय बैठक घेण्याचे ठरले.

तात्पुरता स्थगिती निर्णय
सिडकोकडून तातडीच्या पाणीपुरवठ्याच्या आश्वासनानंतर आणि पुढील चर्चेची खात्री मिळाल्यानंतर, सदरचा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला. ग्रामस्थांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

कोट
गव्हाण गावासाठी हेटवणे पाणीपुरवठ्यातून स्वतंत्र नवीन पाईपलाईन टाकण्याची मागणी आमच्या ग्रामस्थांची आहे. या संदर्भात लवकरच सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे नियोजन करण्यात येणार आहे. तोपर्यंत गावाला मुबलक प्रमाणात योग्य त्या दाबाने पाणीपुरवठा सुरळीत होईल असे हमीपत्र आम्हाला सिडको प्रशासनाने दिले आहे. 
श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे 
मा. विरोधी पक्षनेते 
पनवेल महानगरपालिका.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image