२८ आठवड्यांत जन्म, वजन ९०० ग्रॅम, गंभीर गुंतागुंतींवर मात करत बाळ सुखरूप घरी ; मेडिकव्हर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश...
२८ आठवड्यांत जन्म, वजन फक्त ९०० ग्रॅम ; गंभीर गुंतागुंतींवर मात करत बाळ सुखरूप घरी परतले 

मेडिकव्हर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश, ६० दिवसांच्या उपचारांनंतर बाळाच्या वजनात दुप्पटीने वाढ
 
नवी मुंबई / पनवेल वैभव : 
गर्भधारणेचे अवघे २८ आठवडे पूर्ण झाले असताना जन्मलेल्या बाळाचे वजन केवळ ९०० ग्रॅम होते. जन्मानंतर काही तासांतच बाळाच्या फुफ्फुसाभोवती हवा साचल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली. श्वास घेण्यास होणारा त्रास, मानेजवळ सूज आणि फुफ्फुसांच्या विकासातील गुंतागुंत अशा आव्हानांमुळे पुढील काही दिवस डॉक्टरांसाठीही कसोटीचे ठरले. मात्र, वेळीच केलेले निदान आणि उपचारांमुळे बाळाने या संकटावर मात केली. मेडिकव्हर रुग्णालयात ६० दिवस उपचार घेतल्यानंतर १.८ किलो वजनासह या बाळाला घरी सोडण्यात आले.

 *खारघर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये जून महिन्यात प्रवीण आणि निशा शिंदे यांच्या जुळ्या बाळांचा जन्म झाला.* गर्भवती मातेला गर्भावस्थेतील उच्च रक्तदाब आणि आकडी येण्याचा धोका निर्माण झाल्याने तातडीने सिझेरियन प्रसूती करावी लागली. या वेळी जन्मलेल्या जुळ्यांपैकी मुलगी अवघ्या २८ आठवड्यांत आणि ९०० ग्रॅम वजनाची होती. जन्मानंतर तिला स्वतःहून श्वास घेता येत नसल्याने तातडीने उपचार पुरवत अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. दुसऱ्या बाळालाही श्वसनाचा त्रास होता; मात्र, त्याला विशेष उपकरणांद्वारे श्वसनसासाठी मदत करुन त्याची प्रकृती नियंत्रणात आणण्यात आली.

जुळ्या बाळांपैकी मुलीच्या प्रकृतीत पहिल्या काही तासांतच गंभीर गुंतागुत झाली. कृत्रिम श्वसनयंत्रणेवर उपचार सुरू असतानाही तिचा श्वसनाचा त्रास कमी होत नव्हता. तपासणीदरम्यान छातीच्या दोन्ही बाजूंच्या हालचालींमध्ये असमानता दिसून आली. त्यानंतर ट्रान्सइल्यूमिनेशन चाचणी आणि बेडसाइड अल्ट्रासाऊंडच्या मदतीने उजव्या फुफ्फुसाभोवती मोठ्या प्रमाणात हवा साचल्याचे निदान झाले. या स्थितीला ‘टेंशन न्यूमोथोरॅक्स’ असे म्हणतात. त्यामध्ये फुफ्फुसाभोवती साचलेली हवा फुफ्फुसावर तसेच आसपासच्या अवयवांवर दाब निर्माण करते. त्यामुळे तातडीने सुईच्या साहाय्याने साचलेली हवा बाहेर काढण्यात आली. त्यानंतर छातीमध्ये विशेष नळी बसवून उर्वरित हवा बाहेर काढण्याची व्यवस्था करण्यात आली. या उपचारांनंतर बाळाला मिळणाऱ्या ऑक्सिजनची गरज कमी होऊ लागली.

 *याबाबत मेडिकव्हर रुग्णालयाचे सल्लागार नवजात शिशुरोगतज्ज्ञ आणि एनआयसीयू प्रमुख डॉ. तन्मेश कुमार साहू यांनी सांगितले की,* बाळाचे वजन केवळ ९०० ग्रॅम होते आणि त्याची फुफ्फुसे पूर्ण विकसित झालेली नव्हती. जन्मानंतर काही तासांतच त्याला श्वसनासंबंधी गंभीर त्रास सुरू झाला. यावेळी ऑक्सिजनची गरज ही ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. तपासणीदरम्यान फुफ्फुसाभोवती हवा साचल्याचे लक्षात येताच आम्ही तातडीने उपचार सुरू केले. साचलेली हवा बाहेर काढल्यानंतर बाळाच्या ऑक्सिजनची गरज कमी झाली.

पहिल्या गंभीर गुंतागुंतीतून बाळ सावरत असतानाच चौथ्या दिवशी मानेच्या दोन्ही बाजूंना सूज आल्याचे दिसून आले. तपासणीत ही सूज मानेच्या त्वचेखाली हवा साचल्यामुळे (नेक एम्फिसीमा) निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले. या स्थितीत सूज वाढल्यास श्वासनलिकेवर दाब येऊन श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांनी फुफ्फुसांना कमीत कमी इजा होईल अशा पद्धतीने श्वसनसाहाय्य सुरू ठेवले. दहाव्या दिवसापर्यंत मानेची सूज हळूहळू कमी झाली. बाराव्या दिवशी बाळाला कृत्रिम श्वसनयंत्रणेतून बाहेर काढण्यात आले.

बाळाला श्वसनासाठी कृत्रिम उपकरणांची मदत न घेणे हे देखील एक मोठे आव्हान होते. छातीच्या एक्स-रे तपासणीत फुफ्फुसांच्या काही भागांमध्ये हवा कमी पोहोचत असल्याचे दिसून आले. त्यामुळे ‘ब्रॉन्कोपल्मोनरी डिसप्लेसिया’ (बीपीडी) या फुफ्फुसांच्या विकासाशी संबंधित गुंतागुंतीची शक्यता निर्माण झाली होती. त्यानुसार डार्ट औषधोपचार पद्धती सुरू करण्यात आली. अखेर जन्माच्या ३०व्या दिवशी बाळाला कोणत्याही अतिरिक्त ऑक्सिजनशिवाय श्वास घेणे शक्य झाले.

बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी त्याच्या पोषणावरही विशेष लक्ष देण्यात आले. सुरुवातीला शिरेतून आवश्यक पोषक घटक देण्यात आले. तिसऱ्या दिवसापासून दात्याकडून मिळणारे निर्जंतुक प्रक्रिया केलेले मानवी दूध अल्प प्रमाणात देण्यास सुरुवात केली. १६व्या दिवसापर्यंत बाळाला पूर्ण दूध देणे शक्य झाले. दूध पचवण्यात कोणतीही मोठी अडचण आली नाही. बाराव्या दिवसापासून कांगारू मदर केअर आणि तोंडाच्या स्नायूंच्या विकासासाठी आवश्यक व्यायाम सुरू करण्यात आले. विसाव्या दिवसापासून नॉन-न्यूट्रिटिव्ह सकिंग म्हणजे दूध न पिता चोखण्याचा सराव सुरू केला. ३५व्या दिवसापर्यंत चमच्याने दूध पाजण्यास सुरुवात करण्यात आली. सध्या बाळाला स्तनपान आणि चमच्याने दूध पाजले जात आहे.

उपचारादरम्यान संसर्गाची शक्यता लक्षात घेऊन प्रतिजैविके देण्यात आली. मात्र, रक्ताच्या तपासणीत संसर्गाचे कोणतेही जीवाणू आढळले नाहीत. त्यामुळे दहा दिवसांनंतर प्रतिजैविके बंद करण्यात आली. बाळाच्या हृदयाशी किंवा मेंदूशी संबंधित कोणतीही गुंतागुंत आढळली नाही. मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांमध्ये होणाऱ्या डोळ्यांच्या पडद्याच्या आजारासाठी (आरओपी) नियमित तपासणी करण्यात आली. त्यासाठी कोणत्याही उपचारांची आवश्यकता भासली नाही. हॅमरस्मिथ नवजात न्यूरोलॉजिकल तपासणीतही बाळाची स्थिती गर्भावस्थेच्या वयानुसार सामान्य असल्याचे आढळले.

 *डॉ. साहू यांनी पुढे सांगितले की,* अतिप्रसूती झालेल्या बाळाच्या बाबतीत केवळ त्याचे प्राण वाचवणे पुरेसे नसते, तर मेंदू, फुफ्फुसे आणि इतर अवयवांचा योग्य विकास होणेही तितकेच महत्त्वाचे असते. या बाळाला न्यूमोथोरॅक्स, मानेजवळ हवा साचणे आणि फुफ्फुसांच्या विकासातील गुंतागुंत अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, नियोजनबद्ध उपचार, योग्य पोषण, कांगारू मदर केअर आणि नियमित निरीक्षणामुळे त्याची प्रकृती सुधारत गेली. बाळाची न्यूरोलॉजिकल तपासणी समाधानकारक राहिली, ही आमच्यासाठी महत्त्वाची बाब आहे. १६ ऑगस्ट २०२६ रोजी बाळाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यानंतरही उच्च जोखमीच्या नवजात बाळांसाठी असलेल्या प्रोटोकॉलनुसार नियमित तपासणी सुरू आहे. आतापर्यंत बाळाची वाढ योग्य असून मेंदूमध्ये रक्तस्राव किंवा पेरिव्हेंट्रिक्युलर ल्युकोमॅलेशिया आढळलेले नाही.

रुग्णालयाच्या एनआयसीयूमध्ये सुमारे एक किलो वजनाच्या किंवा गर्भावस्थेच्या २६ ते २८ आठवड्यांत जन्मलेल्या बाळांच्या उपचारांमध्ये आतापर्यंत १०० टक्के जगण्याचे आणि मेंदूच्या विकासाच्या दृष्टीने समाधानकारक परिणाम मिळाल्याचा दावा डॉ. साहू यांनी केला. २०२६ मध्ये अशा गटातील सुमारे दहा बाळांना दाखल करण्यात आले होते. यापैकी काही बाळांना न्यूमोथोरॅक्स आणि ब्रॉन्कोपल्मोनरी डिसप्लेसियासारख्या गंभीर गुंतागुंतींचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत वेळेत निदान, श्वसनाकरिता विशेष सपोर्ट आणि अचुक उपचार महत्त्वाचे ठरतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बाळाच्या पालकांनी सांगितले की, आमचे बाळ जन्माला आले तेव्हा ते इतके कमजोर होते की त्याला श्वास घेण्यासाठीही संघर्ष करावा लागत होता. डॉक्टरांकडून प्रत्येक वेळी नवीन गुंतागुंतीची माहिती मिळाल्यावर आमची भीती वाढत होती. डॅाक्टरांच्या प्रयत्नांनी आज आमचे बाळ १.८ किलो वजनाचे असून स्वतःहून श्वास घेत आहे. त्याची प्रकृती सुधारलेली पाहून आम्हाला खूप समाधान वाटते. डॉ. तन्मेश साहू आणि संपूर्ण एनआयसीयू टीमने कठीण काळात आम्हाला दिलेल्या आधाराबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत.

 *महाराष्ट्र आणि कर्नाटक विभागाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल यांनी सांगितले की,* न्यूमोथोरॅक्सवरील तातडीचे उपचार, प्रगत उपकरणांद्वारे श्वसनासाठी केलेले सहाय्य, पोषण आणि बाळाच्या विकासासाठी आवश्यक काळजी अशा प्रत्येक टप्प्यावर एनआयसीयू टीमने समन्वयाने काम केले. बाळाला केवळ जगवणे नव्हे, तर त्याची योग्य वाढ आणि विकास व्हावा, हे उपचारांचे प्रमुख उद्दिष्ट होते. बाळाची झालेली प्रगती संपूर्ण टीमसाठी समाधानकारक आहे.

 *मेडिकव्हर रुग्णालय, नवी मुंबईचे सेंटर हेड संदीप जोशी म्हणाले की,* वेळीच उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, सातत्याने केले जाणारे निरीक्षण आणि कुटुंबाचा सहभाग यामुळे अशा बाळांच्या प्रकृतीत सकारात्मक पहायला मिळतात.
Comments