संघर्षातून मिळवलेल्या यशाची किंमत खरी असते – पालकमंत्री भरतशेठ गोगावले...
संघर्षातून मिळवलेल्या यशाची किंमत खरी असते – पालकमंत्री भरतशेठ गोगावले

उलवे येथे ‘पालकमंत्री चषक’ ३७ व्या वरिष्ठ राज्यस्तरीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन ; ४५० हून अधिक खेळाडूंचा सहभाग

पनवेल / (प्रतिनिधी) 
संघर्षाशिवाय कोणतेही काम पूर्णत्वास जात नाही. जो संघर्षातून पुढे येतो, त्यालाच खऱ्या अर्थाने यशाची प्राप्ती होते. सहजासहजी मिळालेल्या गोष्टींचे मोल नसते; मात्र संघर्षातून मिळवलेल्या यशाची खरी किंमत असते, असे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले.
फेन्सिंग असोसिएशन ऑफ रायगडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पालकमंत्री चषक’ ३७ व्या वरिष्ठ राज्यस्तरीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) उलवे येथील भूमीपुत्र भवनात पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना पालकमंत्री बोलत होते.
खेळाडूंना प्रोत्साहन देताना पालकमंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले की, खेळामध्ये यश संपादन करण्यासाठी सातत्य, जिद्द, मेहनत आणि संघर्षाची आवश्यकता असते. संघर्षातूनच व्यक्तिमत्त्व घडते आणि यशाचा मार्ग प्रशस्त होतो. खेळाडूंना भविष्यात कोणत्याही प्रकारची मदत आवश्यक असल्यास आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव करताना ते म्हणाले की, दानशूर व्यक्तिमत्त्व कसे असावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अतिशय प्रेरणादायी असून शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
याप्रसंगी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन उलवे येथे झाले, हे आमचे भाग्य असल्याची भावना व्यक्त केली. अशा स्पर्धांमुळे खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळते. राज्यभरातून आलेल्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या क्रीडा कारकिर्दीला नवी उंची प्राप्त करावी, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
तीन दिवस चालणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ४५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. तलवारबाजी या साहसी आणि कौशल्यपूर्ण खेळाला प्रोत्साहन देण्याबरोबरच राज्यातील गुणवंत खेळाडूंना आपले सामर्थ्य दाखविण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य निकिता खारकर, युवासेना माणगाव तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उतेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, भारतीय तलवारबाजी संघटनेचे उपाध्यक्ष अशोक दुधारे, महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे कार्याध्यक्ष शिवाजीराजे जाधव, सरचिटणीस उदय डोंगरे, राजकुमार सोमवंशी, पांडुरंग रणमाळ, अविनाश दुधाने, राहुल वाघमारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजू शिंदे, नगरसेवक रामदास शेवाळे, फेन्सिंग असोसिएशन ऑफ रायगडच्या अध्यक्ष सुवर्णा काकडे, उपाध्यक्ष अजय काकडे, मिलिंद ठाकूर, प्रेरिया स्वामी यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर आणि राज्यभरातून आलेले खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments