कळंबोलीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
कळंबोलीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सागर म्हात्रे, प्रथमेश लघाटे, वैशंपायन आणि श्वेता दांडेकर यांच्या सुरांनी रंगली दिवाळीची पहाट

कळंबोली / प्रतिनिधी 
दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त कळंबोली सेक्टर ५ येथील उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या 'दिवाळी पहाट' या सांगीतिक कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तथा सभापती बबन मुकादम आणि पनवेल महिला मोर्चाच्या अध्यक्षा प्रिया मुकादम यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमात इंडियन आयडॉल फेम गायक सागर म्हात्रे यांनी आपल्या दमदार गायनाने उपस्थितांची मने जिंकली. तसेच सारेगमप फेम वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि श्वेता दांडेकर यांच्या सुमधुर गीतांनी उपस्थित रसिकांना सुरेल संगीताची मेजवानी अनुभवायला मिळाली. विविध लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर संगीतमय वातावरणाने भारावून गेला होता.

प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी आपल्या खास शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत कार्यक्रमात रंगत आणली. त्यांच्या विनोदी आणि खुमासदार निवेदनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी महिलांसाठी विशेष लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे महिलांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला.

दिवाळीच्या पहाटे संगीत, मनोरंजन आणि सांस्कृतिक आनंदाची अनुभूती देणाऱ्या या उपक्रमाला कळंबोलीसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या उत्तम नियोजनाचे आणि दर्जेदार सांगीतिक मेजवानीचे उपस्थित मान्यवर तसेच नागरिकांनी भरभरून कौतुक केले.

दिवाळीचा आनंद नागरिकांसोबत सामूहिकरीत्या साजरा करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या दिवाळी पहाट कार्यक्रमाने कळंबोलीकरांच्या दिवाळी उत्सवात एक वेगळीच रंगत आणली.
Comments