पनवेलमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसविण्याचा मार्ग मोकळा...
पनवेलमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसविण्याचा मार्ग मोकळा...
महापालिकेच्या महासभेत प्रस्तावाला मंजुरी ; महिला व बालकल्याण समिती सभापती ममता प्रितम म्हात्रे यांच्या मागणीला यश


पनवेल, ता. 19( बातमीदार) : महिलांचे आरोग्य आणि मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसविण्याच्या प्रस्तावाला पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ.ममता प्रितम म्हात्रे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला अखेर यश आले असून, महापालिका क्षेत्रातील महिला आणि विद्यार्थिनींना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसविण्यात याव्यात, अशी मागणी म्हात्रे यांनी केली होती. त्याचबरोबर वापरलेल्या सॅनिटरी पॅडची सुरक्षित आणि स्वच्छ पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी डिस्पोजल मशीन उपलब्ध करून देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली होती. मासिक पाळीविषयी महिलांमध्ये आणि किशोरवयीन मुलींमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्याची भूमिकाही त्यांनी मांडली होती.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मशीनच्या देखभालीची जबाबदारी स्थानिक महिला बचत गटांना देण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला आहे. इच्छुक महिला बचत गटांना मशीनची देखरेख, नियमित सॅनिटरी पॅड भरणे आणि किरकोळ दुरुस्ती याबाबत आवश्यक प्रशिक्षण देऊन या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासोबतच स्थानिक महिला बचत गटांसाठी रोजगार आणि उत्पन्नाचे नवे साधन निर्माण होऊ शकते.
या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला महासभेत मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी महापौर, आयुक्त, सर्व सन्माननीय नगरसेवक आणि संबंधित विभागाचे आभार मानले. या निर्णयामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील महिला आणि विद्यार्थिनींसाठी आरोग्य व स्वच्छतेच्या सुविधांमध्ये सकारात्मक भर पडणार आहे.

कोट 
महिलांना आणि विद्यार्थिनींना गरजेच्या वेळी सॅनिटरी पॅड सहज उपलब्ध होणे आवश्यक आहे. मासिक पाळीच्या काळात स्वच्छता आणि आरोग्याची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या उपक्रमात महिला बचत गटांना प्रशिक्षण देऊन त्यांना सहभागी करून घेतल्यास महिला आरोग्याबरोबरच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही चालना मिळेल. महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
ममता प्रीतम म्हात्रे 
सभापती - महिला व बालकल्याण समिती.
Comments