करंजाडे महोत्सवात चिमुकल्यांसह स्थानिक कलाकारांचा जल्लोष..
करंजाडे महोत्सवात चिमुकल्यांसह स्थानिक कलाकारांचा जल्लोष..

देशभक्तीपर गीते आणि लोकनृत्यांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले...

पनवेल/प्रतिनिधी -- करंजाडे सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळाच्या वतीने आयोजित भव्य 'करंजाडे फेस्टिवल'मध्ये गुरुवारी सायंकाळी स्थानिक शालेय विद्यार्थी आणि कलाकारांच्या कलागुणांनी मोठी रंगत आणली. या महोत्सवात 'लंडन स्कूल करंजाडे', 'जिल्हा परिषद शाळा करंजाडे' आणि 'अक्षर ग्लोबल स्कूल' येथील विद्यार्थ्यांसह स्थानिक नृत्य कलाकारांनी देशभक्तीपर गीते आणि बहारदार लोकनृत्याचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.

करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून सुरू झालेल्या या करंजाडे महोत्सवाने यंदा यशस्वीरित्या नवव्या वर्षात पदार्पण केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या महोत्सवाला करंजाडे व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळत आहे. गुरुवारी सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमात तिन्ही शाळांतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आणि स्थानिक नृत्य कलाकारांनी पारंपरिक वेशभूषेत अतिशय सुंदर आणि तालबद्ध सादरीकरण केले. देशभक्तीपर नृत्याविष्काराने उपस्थितांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत झाली, तर लोकनृत्याच्या ठेक्यावर रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली. शालेय विद्यार्थी व स्थानिक कलाकारांना आपले कलागुण सादर करण्यासाठी हक्काचे आणि मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल सहभागी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे व आयोजकांचे मनापासून आभार मानले. त्याचबरोबर सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळाचे पदाधिकारी अतिशय मेहनत घेत आहेत.
Comments