आमदार मंगेश कुडाळकर आणि महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते मंदिर उद्घाटन सोहळा संपन्न
उलवे,( पनवेल वैभव ) ता. ८ : आगरी समाज विकास संघ चुनाभट्टी यांनी बांधलेल्या मुंबईतील पहिल्या एकवीरा देवी मंदिराचा उद्घाटन सोहळा आमदार मंगेश कुडाळकर आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते रविवारी (ता. ८) संपन्न झाला.
यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत प्रमुख मान्यवर उपस्थित होते. त्यांना आरती करण्याचा मान देण्यात आला.
यावेळी महेंद्रशेठ घरत यांचा आगरी समाज विकास मंचातर्फे चांदीचा कलश, शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. आमदार मंगेश कुडाळकर यांनीही महेंद्रशेठ यांचे समाजाचे दानशूर नेते म्हणून अभिनंदन केले.
यावेळी आगरी-कोळी समाजाचे दैवत असलेल्या एकवीरा देवीचे मंदिर उभारण्यासाठी आमदार मंगेश कुडाळकर यांनी बहुमोल सहकार्य केले त्याबद्दल महेंद्रशेठ घरत यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सत्काराला उत्तर देताना महेंद्रशेठ म्हणाले, "मुंबईत मंदिर उभारणे फार जिकिरीचे काम आहे, पण ते धाडस आगरी समाज विकास मंचाने दाखवले, त्याला आमदार मंगेश कुडाळकर यांनी साथ दिली, त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन. आजपर्यंत मी हजारो मंदिरांना सढळ हस्ते मदत केली आहे. मुंबईसारख्या काॅंक्रिटच्या जंगलात मंदिरांचीही तेवढीच गरज आहे. आगरी समाज विकास संघाने पुढाकार घेऊन एकवीरा मंदिर उभारून मोठे काम केले. त्याबद्दल त्यांचे कौतुक करतो."
यावेळी मुरलीधर ठाकूर आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.